Wednesday, August 31, 2016

गणेश मंडळांनी पंचसूत्रीच्या आधारे समाजप्रबोधनाचे काम करावे - जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन




बारामती (उ.मा.का.) दि.31 : शासनाच्यावतीने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंधारण या पंचसूत्रीवर आधारीत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उपक्रमात भाग घेवून प्रत्येक मंडळांनी  उत्सवाबरोबरच समाजप्रबोधनाचे काम करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. तसेच उत्सवाच्या काळात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे  सांगत त्यांनी नागरीकांना यावेळी अश्वस्त केले.
            येथील वसंतराव पवार नाट्यगृहात पोलीस प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या सभेत जिल्हाधिकारी श्री. राव बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, प्रांताधिकारी संतोष जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मिलींद बारभाई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्यास्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळवणारच या सिंहगर्जनेचे हे शताब्दीवर्ष आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. त्यामुळे शासनाने स्वराज्य ते सुराज्य या संकल्पनेवर आधारीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरापासून ते विभागीय स्तरापर्यंत या स्पर्धा होणार आहेत. यास्पर्धेत मंडळांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा. तसेच गणेशोत्सव काळात पाण्यासह ध्वनीचे प्रदुषण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. उत्सव काळात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याचीही सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन श्री. राव यांनी यावेळी केले.
डॉ. जय जाधव म्हणाले, सामाजिक जाणीवेचे भान ठेवण्याबरोबरच सुरक्षिततेचे भान ठेवून सर्वांनी उत्सव साजरा करावा. ध्वनी प्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशानुसारच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. गणेशोत्सव आणि बकरी ईद हे सण एकत्रच आल्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याचे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक करताना श्री. बांगर म्हणाले, बारामती शहरात शांततेत आणि कायद्याच्या सर्व मर्यादा पाळून यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा. पूर्वीपासूनच्या बारामती शांतता पॅटर्न पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुणे ग्रामीण विभागातील चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादींना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाष ढोले, दिलीप ढवाण-पाटील, मच्छिंद्र टिंगरे, डाळजच्या पोलीस पाटील, साधू बल्लाळ, माधव जोशी, अनिता गायकवाड, मोहन मोकाशी यांच्यासह तालुक्यातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बारामती शहर व परिसरातील प्रमुख मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार, ‍विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आभार महावितरणचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांनी मानले. 
*********

No comments:

Post a Comment