Wednesday, August 24, 2016

जलयुक्तची किमया न्यारी.... शेतकऱ्यांसाठी लय भारी ...



                 महाराष्ट्र शासनाकडून सर्वांसाठी पाणी -  टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात  आले आहे. हे अभियान यशस्वीपणे जर राबविले गेले तर महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्न कायमचा मिटेल. यासाठी सरकारबरोबरच प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचा तर चांगला सहभाग असायलाच पाहिजे पण ज्यांच्यासाठी हे अभियान चालू करण्यात आले आहे, त्या सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांनीही या अभियानास सहकार्य करणे अपेक्षित आहे.
                  सध्या राज्यात जवळजवळ 82 टक्के शेती कोरडवाहू व 52 टक्के क्षेत्र  अवर्षण प्रवण आहे. बऱ्याच तालुक्यात भूजल पातळी खालावलेली दिसत आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर बनलाच आहे. त्याचबरोबर पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न पण अधिकाधिक गंभीर बनत चालला आहे.  दुष्काळी भागात वर्षानूवर्षे  पाण्याचा प्रश्न  गंभीर आहे. त्यामुळे शेती, उद्योग, रोजगार निर्मिती होत नाही. राज्य शासनाने टंचाईवर तातडीने मात करण्यासाठी  म्हणून जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून हे  अभियान  गेल्या वर्षापासून सुरु  झाले आहे.  अधूनमधून निर्माण होणारे  टंचाईचे  संकट कायमस्वरुपी दूर करण्यसाठी प्रभावी  उपाययोजना भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते.
                 बांध बंदिस्ती, नाला बंडिग, नाला खोलीकरण व नाला सरळीकरणासह साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे  तसेच ठिबक सिंचन तथा सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे अशा कामांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे पाणी टंचाईमुळे होणारे गंभीर  परिणाम रोखण्यासाठी  महाराष्ट्र सरकारच्या  वतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.
                  या अभियानाचे उद्देश पावसाचे  जास्तीत जास्त पाणी गाव शिवारात अडवणे, भूजल पातळी वाढवणे, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत  वाढ करणे, ग्रामीण भागातील  बंद पडलेल्या  पाणी पुरवठा योजनांचे  पुनर्जिवीकरण करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे तसेच अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची विशेषत: बंधार, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट तलाव, सिमेंट बंधारे यामधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे, लोकसहभागातून वृक्ष लागवड करणे, पाण्याविषयी जनजागृती करणे, पाणी अडवणे व जिरवणे बाबत लोकांना प्रोत्साहित करणे या सारखे अत्यंत महत्वाचे उद्देश या अभियानात आहेत.
                  सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त क्षेत्रात मोडतो  या जिल्ह्याची सुमारे 500 ते 550 मिमि इतकी वार्षिक पर्जन्यमान सरासरी आहे. जिल्ह्यातील या अभियानासाठी पहिल्या टप्प्यात 280 गावांची निवड करण्यात आली होती तर दुसऱ्या टप्प्यात 265 गावांची निवड करण्यात आली. या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या   कामांचे द्ष्यपरिणाम सध्या दिसत असून जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार 273 हेक्टर क्षेत्रांवर सुमारे 5 हजार 440 कामे झाली असून या कामामुळे मागील काही दिवसात पडलेल्या पावसामुळे सुमारे 66 हजार 636 टीसीएम म्हणजेच 2.3 टीएमसी इतक्या पाण्याचा साठा झाला असल्याची माहिती पाणलोट विभागाच्या वतीने  देण्यात आली.  जिल्ह्यात 1 लाख 25 हजार हेक्टरवर कंपार्टमेंट बंडीगची 3 हजार 223 कामे झाली असून यामध्ये 57 हजार 318 टीसीएम, सलग समतल चराची कामे 691 हेक्टरवर करण्यात आली. त्यामुळे 130 टीसीएम तर खोल समतल चरीच्या 912 हेक्टरवरील कामांमुळे 153 टीसीएम  इतका पाणीसाठा झाला आहे.
                  जिल्ह्यात कोल्हापूर पध्दतीच्या 10 बंधाऱ्यांचे काम करण्यात आले असून यामध्ये 2450 टीसीएम इतका पाणीसाठी झाला आहे तर शेततळी व साखळी बंधाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या कामांमुळे सुमारे 4 हजार 300 टीसीएम इतके पाणी जमा झाले आहे त्याचबरोबर माती  नाला बांध टाकण्याची 672 इतकी कामे झाली असून त्याव्दारे सुमारे 1975 टीसीएम इतके पाणी जमा झाले आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 53 पाझर तलाव व 8 मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा वाढला असून त्यामुळे त्या भागातील विहीरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे.
                  पाणी प्रश्नाकडे लोकांनी गंभीरपणे विचार करुन जलयुक्त शिवार अभियानामध्ये अधिकाधिक संख्येने  सहभागी  होऊन  हे अभियान यशस्वी करणे गरजेचे आहे. पाणी प्रश्न हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत  असून या अभियानाचे उद्देश अत्यंत महत्वाचे असे आहेत. या अभियानाच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करणे अपेक्षित आहे.
                                                                                                                                     फारुक बागवान
 जिमाका, सोलापूर
(9881400405)

No comments:

Post a Comment