Friday, August 26, 2016

महा अवयवदान अभियान यशस्वी करावे - डॉ. अजय चंदनशिवे


पुणे. दि. 26 (विमाका): देश व राज्यात अनेक रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अवयवदानाविषयी जनतेमध्ये प्रभावी जनजागृती झाल्यास अशा रुग्णांना अवयव मिळण्याची शाश्वती निश्चितच वाढेल व त्यांना नवे जीवन प्राप्त होईल. त्यादृष्टीने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 दरम्यान राबविण्यात येत असलेले महा अवयवदान अभियान सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आज केले.
            बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयात महा अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने दि. 30 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या अवयवदान जागृती महाफेरीच्या (रॅली) नियोजनाविषयी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी व शहरातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालये, कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांची बैठक डॉ. चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके, बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे व्यासपीठावर उपस्थित होते.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये अवयवदानाविषयी आवाहन केले होते, असे सांगून डॉ.चंदनशिवे म्हणाले की, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यस्तरापासून ते तालुकास्तरापर्यंत महा अवयवदान अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. चाळीस- पन्नास वर्षापूर्वी लोक रक्त द्यायलाही घाबरायचे. आता काहीजन रक्तदानाचे शतकही साजरे करतात. हे केवळ जनजागृतीने शक्य झाले आहे. अवयवदानाविषयी तळागाळापर्यंत जनजागृती झाल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकेल. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारताबाहेर जास्त असून भारतामध्ये ते अत्यल्प आहे. यामुळेच जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
            डॉ. चंदनशिवे म्हणाले की, अवयवांची गरज असलेल्या रुग्णांच्या दृष्टीकोनातून अवयवदान ही जीवनमरणाच्या उंबरठ्यावरील प्रतिक्षा आहे. आताच्या स्थितीनुसार देशात सुमारे 5 लाख मुत्रपिंडाच्या विकारांनी, 50 हजार यकृताच्या विकारांनी आणि 2 हजार हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून त्यांना अवयवांची गरज आहे. मुत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्तशुद्धीकरण हा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, यकृत, हृदय, फुफ्फुस‍ विकारांनी त्रस्त रुग्णांना अवयव प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे.
            दिनांक 30 ऑगस्ट रोजी अभियानाचा शुभारंभ जिल्हा अवयवदान अभियान समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 8 वाजता शहरात सात विविध मार्गांवर विविध महाफेरी निघणार असून त्यांचा समारोप बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर होईल. यामध्ये एकूण 53 महाविद्यालये सहभागी होणार आहेत.  दि. 31 ऑगस्ट रोजी डॉक्टरांसाठी ब्रेन स्टेम डेथ कार्यशाळा, अवयवदान चर्चासत्र, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबीराचे उद्घाटन व महा अवयवदान नोंदणी शिबीर आयोजित केले जाणार असून प्रत्यक्ष अवयवदान केलेल्या अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. www.dmer.org आणि www.ztccmumbai.org या संकेतस्थळांवर अवयवदानाची ऑनलाईन नोंदणीही केली जाऊ शकते. या शिबीरातही ऑनलाईन नोंदणी करुन घेतली जाणार आहे, असेही डॉ. चंदनशिवे यांनी यावेळी सांगितले.
0000



No comments:

Post a Comment