Monday, August 15, 2016

सायबर लॅबमुळे गुन्हेगारांवर वचक- पालकमंत्री विजय शिवतारे



सायबर लॅबमुळे गुन्हेगारांवर वचक- पालकमंत्री विजय शिवतारे
            सातारा, दि 15 (जिमाका) :- सायबर गुन्हे घडूच नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. परंतु घडणा-या सायबर गुन्हयांवर आता सायबर लॅबमुळे वचक बसेल. सातारचे नागरिक सायबर लॅबमुळे अधिक सुरक्षित राहतील, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
            येथील पोलीस मुख्यालयातील वेण्णा सभागृहात पालकमंत्री श्री.शिवतारे यांच्या हस्ते सायबर लॅबचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी अमृत नाटेकर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पोलीस उपअधिक्षक दिपक हुंबरे, खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट आदी उपस्थित होते.
             पालकमंत्री श्री.शिवतारे यांनी यावेळी मा.मुख्यमंत्री महोदयांचा संदेश वाचून दाखविला त्यानंतर ते पुढे म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानामुळे एकिकडे प्रगती होत असतांना गुन्हयांचे स्वरुपही बदलत गेले. सुशिक्षित गुन्हेगार सायबर गुन्हेगारीमध्ये सक्रीय आहेत. हॅकींगसारखे प्रकार तज्ञ मंडळीच करु शकतात. अशा गुन्हयांमध्ये तपास करतांना मुंबई येथील लॅबमध्ये धाव घ्यावी लागत असे यामध्ये वेळ जात होता. मा.मुख्यमंत्र्यांनी सर्वच ठिकाणी सायबर लॅब उद्घाटन करुन अशा गुन्हयांवर जरब निर्माण केली आहे.
            जनतेने आता चिंता करण्याचे काम नाही सायबर लॅबच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक बसेल आणि समाजाचे संरक्षण करता येईल. सातारा येथील सायबर लॅबमध्ये बी.ई. कॉम्प्यूटर पदवी प्राप्त पोलीस काम पहाणार आहेत. त्यामुळे निश्चितच सातारचे नागरिक अधिक सुरक्षित आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.
            जिल्हाधिकारी श्री.अश्विन मुद्गल यांनी, सायबर लॅबचे उद्घाटन हा खुपच महत्वाचा क्षण आहे. पोलीसांसाठी पोलीस विभागाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड आहे. गुन्हेगारीवर निश्चितपणे आळा बसेल, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
            प्रास्ताविकेमध्ये पोलीस अधिक्षक संदिप पाटील म्हणाले, डिजिटल युगामुळे माहिती तंत्रज्ञानच्या वापराने क्रांतिकारक बदल केले आहेत परंतु या युगात वेगवेगळे गुन्हे घडत आहेत, हे मोठे आव्हाण पेलण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वत्र सायबर लॅबचे उद्घाटन होत आहे. शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सायबर गुन्हयामध्ये तपासाची प्रक्रिया किचकट होती. मुंबईतील कलीना लॅबला तपासाला पाठवावं लागायचं. त्यामुळे चार्जशीट दाखल होण्यासाठी वेळ लागायचा. या लॅबमुळे लवकर तपास होण्यासाठी वापर होईल त्याशिवाय गुन्हेगारीवर जरब बसेल, असेही ते म्हणाले.
            यावेळी पालकमंत्री श्री.शिवतारे यांच्या हस्ते फिर्यादींना चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी स्वागत करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
डिलीट मेसेज ही काढता येणार- संदिप पाटील
      पोलीस अधिक्षक श्री.पाटील आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले, मी आल्यापासून 9 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेश थांबवता येणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. या सायबर लॅबच्या मदतीने डिलीट केलेले मेसेजही पुन्हा काढता येणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे गुन्हेगाराला शासन होण्यास मदत होणार आहे.
00000

No comments:

Post a Comment