Tuesday, August 23, 2016

गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प लोकचळवळीचे यश -जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल




            सातारा, दि. 23 (जिमाका) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने यशस्वी ठरला आहे. हे लोकांनी उभे केलेल्या चळवळीचे यश आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी काढले.
            जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या गुळूंब-चांदक ओढा जोड प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. यातील पाण्याचे आज जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌ग यांनी पूजन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार अतूल म्हेत्रे, पंचायत समितीच्या सभापती उमाताई बुलुंगे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, गटविकास अधिकारी दिपा बापट, चांदकचे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच मधुकर खामकर, गुळूंबचे उपसरपंच कृष्णात यादव, उपअभियंता राजकुमार साठे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल पुढे म्हणाले, राज्य शासनाने सर्वांसाठी पाणी या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. हे अभियान राज्यात यशस्वी ठरले आहे. याच अभियानांतर्गत वाई मधील गुळुंब-चांदक ओढा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे, ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. या प्रकल्पासाठी आमदार मकरंद पाटील, किसनवीर सहकारी साखर कारखाना, मॅप्रो, अथर्व फौंड्री त्याचबरोबर ग्रामस्थांनी दिलेला निधी अत्यंत महत्वाचा आहे. या सर्वांची मी आभारी आहे. ग्रामस्थांनी 5 लाखाची मदत केली. ही रक्कम जरी छोटी वाटत असली त्या पाठीमागील गावातून टंचाई हद्दपार करण्याची भावना अत्यंत महत्वाची आहे.
            ज्या पाईपलाईनद्वारे हा प्रकल्प जोडण्यात आला. ती पाईप 5 फूट पाण्यात आहे. हे या प्रकल्पाचे यश म्हणावे लागेल. लोक एकत्र आले तर काय क्रांती घडू शकतो हा प्रकल्प याचे उत्तम उदाहरण आहे. ही एकी, हा निर्धार यापुढेही ग्रामस्थांनी पुढे ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           
पत्रकारांनी लोक चळवळ उभी केली- जिल्हाधिकारी
          सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी जनजागृती करत खऱ्या अर्थाने लोकचळवळ उभी केली. याच लोकचळवळीच्या आधारावर जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरले आहे. या सर्व पत्रकारांचे त्याचबरोबर योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो. दैनिक सकाळने जनजागृतीबरोबरच तनिष्क गटाच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी दोन लाखाचा निधी देवून आपले प्रत्यक्ष योगदान दिले आहे. त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांचा गौरव केला.
   

        याप्रसंगी गुळूंब-चांदक ओढा प्रकल्पासाठी निधी देणाऱ्या मॅप्रोचे ऋषीकेश मापारी, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक रतन शिंदे, सयाजीराव पिसाळ, मधुकर शिंदे, अरविंद कोरडे, ज्ञानदिप सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष गजानन धुमाळ, अथर्व फौंड्रीचे गुलाबराव पाटील, पत्रकार भद्रेश भाटे यांचा तसेच गावासाठी दोन गुंट्टे जमीन दिल्याबद्दल विठ्ठलराव यादव यांचा 60 फूट विहीर गावाला उपलब्ध करुन देणाऱ्या किसन माने यांनाही यावेळी  जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 माजी सरपंच अल्पना यादव यावेळी म्हणाल्या, विकासाच्या मुद्दयावर सर्व ग्रामस्थांचे एकीचे दर्शन घडले. त्यामुळेच हा प्रकल्प रोल मॉडेल ठरला आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडूनही कार्यत्परता दिसून आली, असे सांगून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, तत्कालीन तहसीलदार सदाशिव पडदुने यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment