Thursday, August 18, 2016

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा पाच कोटी नागरिकांना लाभ देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस









पुणे. दि. 18 (विमाका): राज्यातील गोरगरीब जनतेला कॅशलेस उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करणार असून त्यामध्ये पाच कोटी नागरिकांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रुग्णालयांमधील गरीब रुग्णांसाठीच्या राखीव खाटांची माहिती ऑनलाईनरित्या सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यामुळे गरीबांना वेळेत उपचार उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णालयातील नवीन एमआरआय विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
            राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक चांगली आरोग्य योजना असावी या दृष्टीने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात येणार आहे, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, या योजनेत 1200 आजारांवर 500 पेक्षा अधिक नामांकित रुग्णालयांत कॅशलेस उपचार होणार आहेत. त्यासाठीचे वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टकार्ड सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दीड कोटी नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. ही एक वैद्यकीय विमा प्रकारची योजना असणार आहे. मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची कारणं पाहता एकीकडे नापिकी व दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न ज्यामध्ये उपचारांसाठी पैसे नाही अशीही कारणे आत्महत्यांमागे असल्याचे आढळून आले. यामुळे या सर्व आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
            श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडील एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखून ठेवणे गरजेचे असताना यापूर्वी 70 ते 80 कोटी खर्च रुग्णालये करीत होती. गेल्या वर्षभरात सरकारने विविध प्रकारे पाठपुरावा करुन या रुग्णालयांना जबाबदारीची जाणीव करुन दिली. त्यामुळे हेच प्रमाण आता 200 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना यापूर्वी वैद्यकीय मदत देण्यात येत होती. ती यापूर्वी पूर्वी पाच ते दहा हजारांपर्यंत केली जायची त्यामध्ये तीन लाखांपर्यंत भरीव वाढ करण्यात आली आहे. आता याच बरोबरीने नवीन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करुन गरजू रुग्णांना नामांकित रुग्णालयांतून कमीत कमी खर्चात, सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी पर्यवेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ हजार 800 रुग्णांना या कक्षाकडून मदत देण्यात आली आहे. यापैकी पुण्यात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांपैकी जास्तीत जास्त रुग्णांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेण्यास पसंती दाखविण्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
            मुख्यमंत्री म्हणाले की, तंत्रज्ञान अधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांसाठी त्याची किंमत कमी करता येईल. स्मार्ट खेडी योजनेंतर्गत 500 खेड्यात टेलिमेडिसिन योजना राबविण्यात येत असून त्यापैकी पाच  खेडी जे.जे. रुग्णालयाशी जोडण्यात आली आहेत. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टर्सना गावातील गंभीर आजारी रुग्णांवरील उपचाराचे ज्ञान देत होते. अशा प्रकारे आरोग्य सेवांतील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्यांना पोहोचेल यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्रयत्नशील रहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            पालकमंत्री बापट म्हणाले की, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे रुग्णसेवेबाबतचे धर्मादाय कार्य खूप चांगले आहे. नियमानुसार चांगल्या प्रकारे काम झाल्यास सरकारचे कामही खूप हलके होईल. काही बाबतीत कायद्याचा बडगाही उभारावा लागतो, असेही ते म्हणाले.
            रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांनी नवीन एमआरआय सेंटरची व तंत्रज्ञानासह रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या रुग्ण सहाय्यता योजनांचीही माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली. आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले.
00000


No comments:

Post a Comment