Monday, August 15, 2016

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारीवर दहशत बसवावी---पालकमंत्री गिरीश बापट






आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारीवर दहशत बसवावी---पालकमंत्री गिरीश बापट

          पुणे, दि. 15 : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारांवर पोलीस दलाची दहशत व वचक बसली पाहिजे. तसेच गुन्हयाचा तात्काळ शोध लावण्यासाठी राज्याच्या गृहविभागाच्या वतीने महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
            येथील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त्श्रीमती रश्मी शुक्ला, पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त्सर्वश्री सी. एन. वाकडे, शशीकांत शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            याप्रसंगी पालकमंत्री बापट म्हणाले की, सायबर  गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्हयांना प्रतिबंध घालावे, गुन्हेगारांवर दहशत बसावी यासाठी गृहविभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सायबर गुन्हयाचा तात्काळ शोध घेता येईल. राज्यात गुन्हेगारी कमी व्हावी व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटण व्हावे यासाठी पोलीस दलाने प्रयत्न करावेत. या कामासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव द्यावा. त्यानुसार विविध योजनेच्या माध्यमातून  निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी  दिली.
            या सायबर लॅबच्या माध्यमातून एक वर्षात झालेल्या कामाची तुलना मागील वर्षातील कामकाजाशी करता आली पाहिजे. यादृष्टीने कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त  पालकमंत्र्यांनी केली. पोलीस विभागाचा विविध मार्गाने जनतेशी संपर्क वाढला पाहिजे. आपण गुन्हेगारांचे शत्रु व गुन्हे न करणाऱ्यांचे मित्र आहोत. ही भावना जनतेच्या मनात वृध्दींगत करावी. त्याचबरोबर सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी पोलीस दलाने प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री श्री. बापट यांनी केले.
            यावेळी पालकमंत्री बापट यांनी सायबर लॅबच्या उद्घाटनानंतर तेथील व्यवस्थेची पाहणी करुन याबाबतची माहिती जाणून घेवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालकमंत्री बापट यांनी सायबर लॅबच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचे वाचन केले.
            याप्रसंगी सायबर सेलचे पोलीस आयुक्त्दिपक साकारे, पोलीस उपायुक्त्सर्वश्री पंकज डहाणे, गणेश शिंदे, कल्पना बारवकर, पी. आर. पाटील, अरविंद चावरिया, शेषेराव सुर्यवंशी, सायबर सेलचे पोलीस निरिक्षक सर्वश्री दिपक लगड, सुनिल ताकवले आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

                                                                        00000

No comments:

Post a Comment