Tuesday, August 23, 2016

जन्म-मृत्यूची नोंद शंभर टक्के करण्यावर भर द्या - अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव

     
            सातारा, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात जन्माची नोंद 82 टक्के व मृत्यूची नोंद 89 टक्के आहे. ग्रामपंचायत व नगरपालिकांमध्ये जन्म व मृत्यूची नोंद शंभर टक्के करण्यावर भर द्यावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी आज दिल्या.
            एकात्मिक बाल विकास सेवा योजना जन्म-मृत्यू नोंदणी व जीवन विषय जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, महिला बाल विकास सभापती वैशाली फडतरे, नगर पालिका जिल्हा प्रशासन अधिकारी किरण यादव, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी जे.एस. शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
            जन्म-मृत्यूच्या नोंदणी शंभर टक्के होण्यासाठी गावपातळीवरील समित्या कार्यान्वीत करा, अशा सूचना करुन अपर जिल्हाधिकारी श्री. यादव पुढे म्हणाले, जन्म-मृत्यूच्या नोंदणीची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यांना द्या. त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला आढावा घ्या. प्रत्येक ग्रामसभेच्या वेळी जन्म-मृत्यूच्या नोंदीचे वाचन करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत एक परिपत्रक काढा.
            केंद्र शासनमार्फत जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी crsorgi.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या संकेतस्थळावर अद्यावत माहिती भरावी. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा ग्रामपंचायतींनी एक रजिस्टर ठेवून शक्य होईल तेथून जन्म-मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन भरावे. तसेच जिल्हयातील बाल मृत्यू माता मृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा, गट व गाव पातळीवरील शासकीय विभागांशी समन्वय ठेवावा, अशा सूचनाही             श्री. यादव यांनी शेवटी केल्या.

0000

No comments:

Post a Comment