Thursday, August 18, 2016

ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


पुणे. दि. 18 (विमाका): महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन्  उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कारसाठी 10 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट  ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार रुपये, तीस हजार, वीस हजार आणि दहा हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक  देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी  पंचवीस हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह  देऊन गौरवण्यात येते.
2016-17 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवकांनी आपले विहीत नमुन्यातीलअर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत दोन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. असेही  श्री. धांडोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

******










No comments:

Post a Comment