Monday, August 22, 2016

जिल्ह्यासाठी सुमारे 3 हजार क्विंटल तूरडाळ उपलब्ध




सोलापूर दि. 22 :-  राज्यात तुरडाळीचे दर गगनाला भिडल्यामुळे राज्य शासनाने सर्वसामान्यांना कमी दरात तुरडाळ उपलब्ध करुन देण्यासाठी  रेशनव्दारे तुरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार पहिल्या महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 829 क्विंटल तुरडाळीचा कोटा मंजूर झाल्याची माहिती, जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
                     जिल्ह्यातील अंत्योदय आणि बीपीएल  शिधापत्रिकारकांना कमी दरात रेशनव्दारे तुरडाळ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 77 हजार 808 अंत्योदय लाभार्थी व 2 लाख 5 हजार 151 बीपीएल लाभार्थी आहेत. त्यानुसार अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 778 क्विंटल आणि बीपीएलच्या लाभार्थ्यांना 2 हजार 51 क्विंटल तुरडाळीचा कोटा प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामामुळे तुरडाळीचा कोटा आलेला आहे. रेशन दुकानदार कडून आता कोटा उचलण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलो तुरडाळ 103 रुपये दराने विक्री करावयाची आहे.
                   ऑगस्ट 2016 महिन्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली तुरडाळ लाभार्थ्यांना जलदगतीने वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना तात्काळ परमीट देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत तुरडाळ गोदामामध्ये शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  दुकानदारनिहाय मंजूर नियतनाची प्रत ग्रामस्तरीय, न.पा.स्तरीय, दक्षता समितीच्या सदस्यांना उपलब्ध करुन द्यावी. त्याचबरोबर अपात्र, बोगस अथवा एकाच शिधापत्रिकाधारकाला दुबार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा तुरडाळ दिली जाणार नाही अथवा तुरडाळीचा अपहार, गैरमार्गाने विल्हेवाट लावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शासकीय धान्य गोदामामध्ये तुरडाळ प्राप्त झाल्याचा, तुरडाळ वाटपाबाबतचा गोदामनिहाय दैनंदिन अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास सादर करावा असे आवाहन या कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 
00000

No comments:

Post a Comment