Friday, August 26, 2016

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा - जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे


सातारा, दि. 26 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य  केले आहे. त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने आदान-प्रदान करुन त्यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले पाहिजेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांनी आज केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शिक्षण विभागाच्यावतीने गुणवंत्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. नरळे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष रवी साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, समाज कल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, महिला व बाल विकास सभापती वैशाली फडतरे, जिल्हा परिषद सदस्य तथा कार्यक्रम समन्वयक संदीप शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी जे.एस. शेख, आकाशवाणीचे सहायक संचालक इंद्रजित बागल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव,  किशोर तपासे, अरुण जावळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश त्यांनी समाजाला दिला, असे सांगून श्री. नरळे पुढे म्हणाले,  मॅट्रीकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये पदवी मिळविली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना अमेरिकेतील पुढील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.  डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आधारस्थान आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांनी केलेले कार्य हे कायमस्वरुपी  अबाधित राहिल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी समाजासाठी आपले संपूर्णपणे आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्याची जाणीव ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आपल्या समाजासाठी उपयुक्त ठरत असून  त्यांच्या चरित्रातून भावी पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवामुळे भारतीय राज्यघटना अनेक अंगांनी परिपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.  भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा उपासना यांचे स्वातंत्र आणि दर्जा संधीची समानता मिळवून देण्यासाठी घटनाकारांनी घटनात्मक तरतुदी केल्या आहेत. बाबासाहेबांचे विचार समजण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजेत. त्यांनी दिलेली समतेची शिकवण सर्वांनी स्वत: आचरणातून अंगिकारली पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष रवी साळुंखे, सतीश चव्हाण, किशोर तपासे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी. मध्ये निवड झालेले गुणवंत विद्यार्थी, शासकीय वसतिगृहामध्ये, खासगी अनुदानित वसतिगृहामध्ये राहणाऱ्या इ.10 वी व इ.12 वी मध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशसंपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 125 व्याख्यांनाचा  संकल्पाच्या निमित्ताने अरुण जावळे यांचाही सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, मेघना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment