Monday, August 15, 2016

स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण कराड - चिपळूण रेल्वेमार्ग जिल्हयासाठी वरदान - पालकमंत्री विजय शिवतारे






           स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
       कराड - चिपळूण रेल्वेमार्ग जिल्हयासाठी वरदान - पालकमंत्री विजय शिवतारे
            सातारा, दि 15 (जिमाका) :- कालच कराड-चिपळूण रेल्वे मार्ग प्रकल्पाचा सामंजस्य करार मा.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला हा प्रकल्प साता-यासाठी वरदान ठरेल. जिल्ह्यातील माण-खटाव दुष्काळी भागातील जनतेच्या दृष्टीने महत्वाची असलेली जिहे-कटापूर ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर ते बोलत होते.  ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, आमदार आनंदराव पाटील,जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार,निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर आदी उपस्थित होते.
        पालकमंत्री विजय शिवतारे यावेळी शुभेच्छा देताना पुढे म्हणाले, धरणांमधून होणारा विसर्ग जेथे जेथे टंचाई आहे, तेथे तेथे कालव्याव्दारे सोडण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान कृषी योजना अत्यंत चांगली असून त्या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. कराड चिपळूण हा 103 किलोमीटर लांबीचा 3 हजार 196 कोटीचा प्रकल्प जिल्हयाच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. यातील 66 किलोमीटर भाग हा सातारा जिल्हयामध्ये आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            माण-खटाव भागातील शेतक-यांना पाणी देण्यासाठी जिहे -कटापूर योजनेचे काम  लवकरच कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने कृष्णा नदीवरील बॅरेजचे व पंपगृह क्रमांक 1 चे 54फूट उंचीचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. सध्या त्यासाठी 30 कोटी इतका निधी उपलब्ध झाला असून आणखी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेव्दारे येत्या दीड वर्षात दुष्काळी भागातील शेतक-यांना निश्चितपणाने पाणी मिळेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
            जिल्ह्यातील आय ए एस व आय पी एस बनू पहाणा-या विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधिनीचा लाभ घ्यावा, असे सांगून पालकमंत्री श्री.शिवतारे पुढे म्हणाले, बंद पाईपलाईन योजना करण्याचे धोरण शासनाने स्वीकारलं आहे. निरा-देवधरचे पाणी धोम-बलकवडीत टाकून पुढे नेता येईल का या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. वांगणा उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचे धोरण आहे. जसजसे तंत्रज्ञान विकसीत झाले तस तसे गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत गेलं. अशा गुन्हयातील तपासासाठी मुंबईतील सायबर लॅबमध्ये तपासासाठी पाठवावा लागायचे त्यासाठी वेळ लागायचा परंतु मा.मुख्यमंत्री यांनी सर्वच जिल्हयांमध्ये सायबर लॅब उद्घाटनाचा निर्णय घेतला सातारासाठीही आज या लॅबचे उद्घाटन होत आहे. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल. सातारची धावपटू ललिता बाबर हिने रिओ ऑलम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. ही जिल्हयासाठी कौतुकाची गोष्ट आहे निश्चितपणे ती सुवर्णपदक मिळवेल त्यासाठी तिला देशाच्यावतीने मी शुभेच्छा देतो.
            जलयुक्त शिवारमध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे काम झाल्याचे सांगून, त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये ज्या ज्या लोकांनी सक्षम यंत्रणांनी कंपन्यांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांचे यावेळी पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
            यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषदेच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री श्री.शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर माझा सातारा या ॲन्ड्रॉईड ॲपचे उद्घाटनही करण्यात आले.
            ज्येष्ठ माजी सैनिक श्री. चव्हाण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
        ज्येष्ठ माजी सैनिक गोविंद भुजिंगा चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देवून पालकमंत्री श्री.शिवतारे यांनी यावेळी सत्कार केला. बेळगांव जिल्हयातील हुकीरे तालुक्यातील कनगले गावचे  (सध्या राहणार सातारा) श्री.चव्हाण यांचा 1920 मध्ये जन्म झाला आहे. 4 फेब्रुवारी 1943 रोजी मराठा लाईट एन्फंट्रीमध्ये  ते सेवेत रुजु झाले. 1944-46 दरम्यान ब्रम्हदेश, रंगून, शिंगापूर, युरोप व टोकीओ या ठिकाणी जर्मनीविरुध्द ब्रिटीश भारतीय फौजामार्फत भाग घ्यावा लागला यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस, कॅप्टन लक्ष्मी सैगल, जनरल जगन्नाथ भोसले आदींची भेट.
            1946 ला भारतीय चळवळ चालू असतांना ब्रिटीश सैनिकामधून भारतीय सैनिकांना व समाजसेवक लोकांना सहकार्य. 1947 भारतीय सैनिकाविरुध्द ब्रिटीशांच्या सैनिकाविरुध्द संघर्ष करण्याची वेळ आली. भारत स्वातंत्र होण्यासाठी सहभाग घ्यावा लागला. 1948  पाकिस्तान फाळणी, जातीय दंगली, आतंकी परिस्थिती यावेळी लढले. 1950 जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावग्रस्त परिस्थितीला 11 दिवस प्रशासन नसलेल्या ठिकाणी कारगिल जवळील घुमरी या ठिकाणी दिवस काढण्यात आले. 1954 भारत - पाकिस्तान तणावमध्ये भारतीय सेनेमार्फत सहभाग. 1956 भारत पाकिस्तान बॉर्डर पुंछ सेक्टरमध्ये सहभाग. 1962-63 भारत चिण युध्दामध्ये भारतीय सैनिक म्हणून नेतृत्व केले.
            याप्रसंगी प्रांताधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तुषार ठोंबरे,जलसंपदाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा पुनवर्सन अधिकारी संजय असवले, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नेताजी कुंभारे, विवेक जाधव, गजानन गुरव आदींसह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment