Wednesday, August 24, 2016

उस पिकासाठी ठिबक सिंचन या विषयावरील चर्चासत्र संपन्न ठिबक सिंचनामुळे उसाच्या उत्पादनात वाढ ... सहकार मंत्री सुभाष देशमुख


            पुणे, दि. 24 – दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी उसासाठी प्राधान्याने ठिबक सिंचनाचा वापर करावा व त्यासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
            उस पिकासाठी ठिबक सिंचन या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन साखर आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात साखर कारखान्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. साखर आयुक्त डॉ.विपीन शर्मा, साखर व पणन संचालक डॉ.किशोर तोष्णिवाल, सहआयुक्त (विकास) पांडूरंग शेळके, पृथ्वीराज देशमुख यावेळी उपस्थित होते.
            चर्चासत्रात मार्गदर्शन करताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, काही निवडक साखर  कारखान्यांनी उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करुन उत्पादन वाढविले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे साखर कारखान्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व  व त्या दूर करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. साखर कारखान्यामुळे परिसराचा आर्थिक विकास होतो. पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब मातीमध्ये जिरवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याची भूमिका साखर कारखाना पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.  शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या सर्व अडचणी दूर व्हायला पाहिजे यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे.
            साखर कारखान्यांनी उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करावा असे सांगून सहकार मंत्री देशमुख यांनी अनुदानाची मागणी करण्यापेक्षा साखर कारखाना आर्थिकदृष्टया समक्ष होईल यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांच्या आपापसातल्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांचे नूकसान होणार नाही याची काळजी घेतानाच कारखाना व्यवस्थापनात व्यावसायीकता आणावी अशी सूचना केली.
            साखर आयुक्त वीपीन शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये उस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले.
            चर्चासत्रात उपस्थित साखर कारखाना पदाधिकाऱ्यांनी यावेळी उस उत्पादनात ठिबक सिंचनाचा वापर करताना येणाऱ्या अडचणी व त्याचे नियोजन यावर सहकार मंत्री देशमुख यांच्याशी थेट संवाद साधला.
            या चर्चासत्रात राज्यातील सर्व भागातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी, अधिकारी यांनी भाग घेतला.
0000
2 Attachments

No comments:

Post a Comment