Monday, August 29, 2016

अवयव दान श्रेष्ठ दान


अवयव दान म्हणजे एखाद्या जिवंत अथवा मृत व्यक्तीच्या शरिरातून अवयव घेऊन दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरिरात प्रत्यारोपीत करणे म्हणजे अवयव दान. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून एक काळाची गरज बनली आहे. आपण मृत्यूनंतरही आपले अवयव दान करुन ज्यांचे निकामी झाले आहेत अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. कायमस्वरुपी अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव दान हा एक आशेचा किरण आहे. महाराष्ट्र शासनाने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अवयव दान महा अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या विषयी थोडक्यात माहिती.
                मेंदूस्तंभ झालेली व्यक्ती म्हणजे अशी मृत व्यक्ती जीची ह्दयक्रिया चालू आहे पण मस्तिष्कस्तंभ मृत झाला आहे अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मुत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, ह्दय, आतडी, डोळे, त्वचा, ह्दयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे दान करु शकते. सामान्य मृत्यू म्हणजे ह्दयक्रिया बंद पडलेली व्यक्ती, डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते. जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करु शकते. नातेबाह्य रुग्णांसाठी अवयव दान करवयाचे झाल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्ती फक्त मर्यादीत अवयवांचे म्हणजे मुत्रपिंड अथवा यकृतचा काही भाग दान करु शकते.
                शासनाने मान्यता दिलेले 4 डॉक्टर्स एकत्रितपणे मस्तिष्कस्तंभ मृत्यूच्या चाचण्या करुन एखाद्या रुग्णास ब्रेन डेड घोषित करतात या चार डॉक्टरांचा अवयव प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नसतो. या प्रकरणात मृत्यू फक्त अवयव प्रत्योरोपणासाठी आणि अवयव काढण्याकरिता शासनाची मान्यता असलेल्या रुग्णालयांमध्ये घोषित करता येते.
                मस्तिष्कस्तंभ मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असणाऱ्या रुग्णालयात घोषित करता येत असल्याने अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते परंतु डोळे व त्वचा यांचे दान घरी मृत्यू झाला तरी 6 तासापर्यंत होऊ शकते.
                भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा सन 1994 नुसार अवयवदानास मान्यता आहे. मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, अवयव विकणे, विकत घेणे व त्यासाठी जाहिराती करणे किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
                गरजू रुग्णाचे वय, रक्तगट, आजाराची तीव्रता, किती दिवस अवयवांची प्रतिक्षा करीत आहेत, वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णास काही गुण दिले जातात. गरजू रुग्णांची सामायिक प्रतिक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजु रुग्णासच अवयव दिला जातो.  अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्यामार्फत पारदर्शकपणे होते.
                नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णांचे नव व पत्ता सांगितला जात नाही. तसेच अवयव दानासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला आर्थिक  अथवा कुठल्याही स्वरुपाचा मोबदला दिला जात नाही. परंतु अवयव दानाला संमती दिल्यानंतर अवयव दानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
                एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करायची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमीत्तीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकाची सही आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते. हे कार्ड सतत आपल्या जवळ बाळगावे जेणेकरुन त्याच्या नातेवाईकांना अथवा मित्र परिवाराला अवयव दान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. डोनर कार्डवर सही केली असली तरी मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमत्तीशिवाय अवयव दान होऊ शकत नाही म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
चला तर मग अवयव दान अभियानात सहभागी होवूया सर्वश्रेष्ठ दात्याचा मान आपण घेवूया

                                                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
00000


No comments:

Post a Comment