Monday, August 15, 2016

सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त - पालकमंत्री विजयकुमार देशमुख









सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी
सायबर लॅब उपयुक्त
                                                                       - पालकमंत्री विजयकुमार देशमुख

सोलापूर दि. 15:- सायबर गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी व सायबर गुन्ह्यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सायबर लॅब पोलीस दलासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
                       सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत तालुका पोलीस स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या सायबर लॅब व नागरिकांसाठी अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणीती‍ शिंदे, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु, मनपा आयुक्त विजयकुमार काळम - पाटील, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एम. मालदार आदी मान्यवर उपस्थित होते.
                      पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी सायबर लॅब सुरु करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. सायबर लॅब मुळे या क्षेत्रात घडणा-या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. तसेच सायबर लॅबमुळे पोलीस यंत्रणा सक्षम होणार असल्याचेही ते म्हणाले.
                     राज्य शासनाने पोलीसांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पोलीसांना नजीकच्या काळात एक लाख घरे बांधून देण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीसांना यात्रा, वारी यासारख्या प्रसंगामध्ये अव्याहतपणे काम करावे लागत आहे. पंढरपूर येथे वारी सुरक्षेसाठी येणा-या पोलीसांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील पोलीसांसाठी नवीन वसाहत बांधण्याचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचे वाचन केले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
                      जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, सायबर लॅबमुळे पोलीस यंत्रणा सक्षम झाली असून यामुळे या क्षेत्रात घडणा-या गुन्ह्यांवर आळा घालण्याबरोबर त्यांचा शोध घेण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेऊन अद्यावत तंत्रज्ञान पोलीसांनी आत्मसात करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                      याप्रसंगी खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणीती शिंदे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी आभार मानले. समारंभास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुलकर्णी, प्रांताधिकारी शहाजी पवार, कार्यकारी अभियंता विलास मोरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
                     या कार्यक्रमानंतर पोलीस आयुक्त कार्यालयातील सायबर लॅबचेही उद्घाटन पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment