Tuesday, August 16, 2016

महाराष्ट्रात प्रथमच ‘जयंती’ रोहू माशाचे प्रजनन सप्टेंबरपासून प्रजननासाठी मत्स्यबीज उपलब्ध होणार



पुणे. दि. १६ (विमाका) : सर्वसाधारण रोहू माशापेक्षा पंचवीस टक्के अधिक जलद वाढ होणाऱ्या ‘जयंती’ रोहू या नवीन प्रजातीचे महाराष्ट्रात प्रथमच हडपसर येथील मत्सबीज केंद्रात यशस्वीरित्या प्रजनन करण्यात आले असून येत्या सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावरील संवर्धनासाठी या जातीचे मत्स्यबीज उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती केंद्राचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी बी एस. पाटील यांनी दिली.
            भारतीय कृषी अनुसंधान परिसर (आयसीएआर) अंर्तगत केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था भुवनेश्वर या संस्थेने ‘जयंती’ रोहू ही नवीन प्रजाती विकसित केली आहे. बाजारपेठेत या प्रजातीला चांगली मागणी आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे व तत्कालीन सहायक आयुक्त श्री. नाडगौडा यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विज्ञान महामंडळ हैद्राबाद (एनएफडीबी) मार्फत २०१४ मध्ये ‘जयंती’ रोहू या जातीच्या 200 नग मत्स्यबोटुकलींचे मत्स्यबीज केंद्र हडपसर येथे संचयन व संवर्धन करण्यात आले. या वर्षी हे मासे प्रायोगिक प्रजननास उपयुक्त झाल्याने  दि. ९ ऑगस्ट रोजी केंद्रामध्ये त्यांचे प्रजनन यशस्वी झालेले आहे. भविष्यात व्यापारी तत्वावर प्रजननाचे प्रयोग केंद्रात घेण्यात येणार आहेत. हा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच यशस्वी झालेला आहे. प्रायोगिक तत्वावर या ‘जयंती रोहू’ जातीचे बीज सप्टेंबर २०१६ मध्ये केंद्रात उपलब्ध होऊ शकेल.
हा  प्रयोग यशस्वी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड, प्रादेशिक उपयुक्त उ.खं. बनसोडे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.     

00000


No comments:

Post a Comment