पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘शासकीय वसतिगृह प्रवेश योजना’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केले आहे.
राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग घटकांतील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नयेत या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. या या योजनेंतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात साहाय्य पुरविले जाते. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. संपर्ण गुणवत्ता आणि पारदर्शकतेने अर्जांची छाननी, निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुविधा, वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’अंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजना उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार ठरणार आहेत.
अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व ओळखपत्र यांची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, लातूर व अमरावती येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयांमार्फत अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत वसतिगृहात प्रवेश व शैक्षणिक खर्चासाठी निधी देण्यात येईल, असे श्री. धुळाज यांनी कळविले आहे.
अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली आहे. ज्ञानज्योती योजना आणि वसतिगृह प्रवेश योजनेद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम अशी शैक्षणिक वाटचाल घडवून आणली आहे. या योजनांमुळे ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करू लागल्या आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
0000
No comments:
Post a Comment