Wednesday, August 20, 2025

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई, दि. २० : केंद्र शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. “अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा” या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.
स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.
या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.
000

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. १९ ऑगस्ट, २०२५..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार
मुंबई, दि. १९ : - गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने महाऱाष्ट्र शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री कोकणात तसेच अन्यत्र जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी पेक्षा जादाच्या ३६७ फेऱ्यांचे नियोजन केले जाईल, असे पत्रोत्तर दिले आहे, असे, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत राहणारे कोकणवासी गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुळगावी कोकणात जातात. तसेच राज्याच्या अन्यभागातील नागरिक देखील या सणासाठी प्रवास करतात. या सगळ्यांची या जादाच्या फेऱ्यांमुळे सोय होणार आहे. राज्यातील गणेशभक्तांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
००००

Monday, August 11, 2025

नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध -रूपाली चाकणकर


पुणे, दि.७ : महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) २०१३ या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश ऍडव्हायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, उपसचिव डॉ पद्मश्री बैनाडे, महिला बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, कामगार कल्याण विभागाचे सह संचालक श्री गिरी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, अमृता करमरकर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या,
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आस्थापन प्रशासनाची आहे. महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगत महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया राबवित न्याय मिळवून द्यावा.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तथापि अद्यापही विविध आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. या कार्यशाळेतील माहितीचा विविध आस्थापनामध्ये निश्चित उपयोग होईल अशा विश्वास त्यांनी व्यकत केला.
राज्यात सुमारे ३१ टक्के महिला विविध आस्थापनांमध्ये काम करीत आहेत. महिलांकरिता असलेल्या कायद्याविषयी समितीने माहिती देण्यासोबतच त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचेही काम करावे, महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून समितीने काम करावे, याकामी महिला आयोगाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.
दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा वारंवार आढावा घेतला जातो, आगामी काळात या समितीच्या कामकाजाचे परीक्षण करण्याच्याअनुषंगाने आयोगाच्यावतीने राज्यशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.
आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले, पुणे जिल्ह्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले आहे, यामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाची भर पडली आहे, त्यामुळे याठिकाणी विविध खासगी आस्थापना, सेवाक्षेत्रात महिला कर्मचारी काम करतात, या महिलांना सुरक्षितता पुरविण्याच्यादृष्टीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता अशा स्वरुपाची कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. महिलाच्या सुरक्षिततेसोबत सदृढ मनाच्या समाजाची निर्मितीकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन श्रीमती आवडे यांनी केली.
या कार्यशाळेत यशस्वी समुहाच्या अमृता करमरकर यांनी कायद्याच्या अनुषंगाने सर्व आस्थापनांना त्यांची भूमिका, जबाबदारीबाबत अवगत केले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ ऐश्वर्या यादव यांनी न्यायालयीन प्रकरणे आणि निकालाबाबत मार्गदर्शन केले. विविध कंपन्यांचे उद्योग तज्ज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

Wednesday, August 6, 2025

वसतिगृह प्रवेश व ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी अर्ज प्रक्रिया सुरु

 


पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘शासकीय वसतिगृह प्रवेश योजना’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केले आहे.


राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग घटकांतील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नयेत या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. या या योजनेंतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात साहाय्य पुरविले जाते. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. संपर्ण गुणवत्ता आणि पारदर्शकतेने अर्जांची छाननी, निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी होणार आहे.


प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुविधा, वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’अंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजना उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार ठरणार आहेत.


अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व ओळखपत्र यांची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, लातूर व अमरावती येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयांमार्फत अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत वसतिगृहात प्रवेश व शैक्षणिक खर्चासाठी निधी देण्यात येईल, असे श्री. धुळाज यांनी कळविले आहे.


अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली आहे. ज्ञानज्योती योजना आणि वसतिगृह प्रवेश योजनेद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम अशी शैक्षणिक वाटचाल घडवून आणली आहे. या योजनांमुळे ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करू लागल्या आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

0000

डी.एल.एड. परीक्षेचा निकाल जाहीर

 

पुणे, दि. ५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल https://www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२५ असा राहील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
डी.एल.एड. परीक्षेसाठी मराठी माध्यमांच्या ९ हजार ९६१, उर्दू- २ हजार ३१८, हिंदी- २६२, इंग्रजी- १ हजार ३३१ व कन्नड माध्यमांच्या ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १३ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ९ हजार २ विद्यार्थी म्हणजे ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार आहे, अशी माहितीही श्रीमती ओक यांनी दिली आहे.
0000

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

 

मुंबई, दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
२० गंभीर आजारासाठी मदत
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे
• रूग्णाचे आधार कार्ड
• रूग्णाचे रेशन कार्ड
• रूग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो जोडणे बंधनकारक आहे.
• तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे)
• संबंधित आजाराचे वैद्यकिय रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे.
• वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
• रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
• अपघात ग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.
• अवयव प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.
सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल फ्री ९३२१ १०३ १०३ या क्रमाकांवर चौकशी करावी.
पुणे विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
पुणे २१४२ २० कोटी ५६ लाख ९१ हजार
कोल्हापूर १७१३ १३ कोटी १७ लाख ६४ हजार
सांगली ९३६ ७ कोटी ३५ लाख ७८ हजार
सोलापूर ७६४ ६ कोटी ५८ लाख २० हजार
सातारा ८४० ७ कोटी २२ लाख ८५ हजार
कोट----
संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रूग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.
000000

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 

मुंबई, दि. ६: उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांशी संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
संपर्क क्रमांक-
👉 राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
👉 राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१
०००