Wednesday, May 2, 2018

पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वीकारला




पुणे दि. 2: पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज स्वीकारला. ते यापूर्वी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून कार्यरत होते.
चंद्रकांत दळवी हे विभागीय आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात  पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव, नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. 2010 सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियाना’त पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला  त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता.
डॉ. म्हैसेकर यांच्या कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कार्यकाळात कोल्हापूरला यशवंत पंचायत राजचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी तीन वर्षाच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 
उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. म्हैसेकर यांना वाचनाची आवड आहे. डॉ. म्हैसेकर यांचे उपायुक्त  श्री. प्रताप जाधव आणि उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी स्वागत केले.

*****






1 comment: