पुणे दि. 5 : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील पुणे महानगरपालिकेच्या कै. गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक विद्यालयात आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती. मीनाक्षी राऊत, सहायक प्रशासकीय अधिकारी श्री. विजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जगण्याची कला शिकवत असतात. विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृती, आदर असे पैलू पाडण्याचे काम गुरुजन करतात असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन एखादी कलाकृती साकारतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपले शिक्षक आपल्या आईवडीलानंतर आपले पालकच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
यावेळी विभागीय आयुक्तांनी शाळेतील शिक्षकांचा पुष्प व पुस्तके देऊन सत्कार केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा कदम, संभाजी बांडे, सुभाष सातव, राधिका बडगुजर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कस्तुरबा विद्यालयातील शिक्षकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार
शिक्षक दिनानिमित्त आज विभागीय आयुक्तांनी कोरेगाव पार्क येथील पुणे महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी प्राथमिक इंग्लिश विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गिरी, शिक्षक मोनिका शिरसाट, रुपाली सोनवणे, महादेव कोळी, नितीन कांबळे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000












No comments:
Post a Comment