Tuesday, October 1, 2019

विभागीय आयुक्तांनी दिली “सिंगल यूज प्लास्टीक बंदी”ची शपथ पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टीक बंदी आवश्यक –डॉ. दीपक म्हैसेकर



पुणे दि. 1 : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सिंगल यूज प्लास्टीक बंदीची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सिंगल यूज प्लास्टीक बंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (करमणूक) जयंत पिंपळगावकर, उपायुक्त (पंचायत) चंद्रकांत गुडेवार, नगर पालिका प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत जोरदार काम सुरू आहे. पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिकचे विपरीत परिणाम मनुष्यासह प्राणी व पक्षांवर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या प्लास्टिकच्या विळख्यातून आपल्याला वसुंधरेचे रक्षण करावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच प्लास्टीकवर बंदी आणली आहे. याची आपल्याला प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून या कामात नागरिकांना सहभागी करून घेण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत खांडकेकर यांनी सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामाबरोबरच ही मोहिम राबविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावयाचे असल्याचे सांगितले.
यावेळी प्लास्टीच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रशानातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******






No comments:

Post a Comment