Friday, June 3, 2022

‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल-राज्यमंत्री कु.आदिती तटकरे तळेगाव दाभाडे येथे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाचे अनावरण

 




पुणे दि.३- मुली आणि महिलांच्या प्रगतीशील वाटचालीचे उद्दीष्ट समोर ठेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात आलेले ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल. या शिल्पाची प्रतिकृती आपल्याही भागात उभारू, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात आलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके, बबन भेगडे, गणेश खांडगे, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, एखाद्या भागातील चांगल्या विकासकामांचे अनुसरण इतर भागातही होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामांची माहिती घेतल्यास आपल्या भागात चांगली कामे करता येतील. मावळ परिसरात वेगाने विकासकामे होत आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकप्रतिनीधी म्हणून आपण केलेल्या कामावर पुढे संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्याने जनतेचे काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मिळाल्यानंतर आपल्या कामावर यश अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या.
आमदार शेळके म्हणाले, स्त्री भृणहत्या थांबली पाहिजे, मुलींना शिक्षण मिळायला हवे आणि त्यांना स्वावलंबी करायला हवे. समाजामध्ये ही बाब रुजविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील.

No comments:

Post a Comment