महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Monday, August 11, 2025
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध -रूपाली चाकणकर
Wednesday, August 6, 2025
वसतिगृह प्रवेश व ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी अर्ज प्रक्रिया सुरु
पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘शासकीय वसतिगृह प्रवेश योजना’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केले आहे.
राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग घटकांतील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नयेत या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. या या योजनेंतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात साहाय्य पुरविले जाते. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. संपर्ण गुणवत्ता आणि पारदर्शकतेने अर्जांची छाननी, निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुविधा, वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’अंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजना उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार ठरणार आहेत.
अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व ओळखपत्र यांची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, लातूर व अमरावती येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयांमार्फत अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत वसतिगृहात प्रवेश व शैक्षणिक खर्चासाठी निधी देण्यात येईल, असे श्री. धुळाज यांनी कळविले आहे.
अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली आहे. ज्ञानज्योती योजना आणि वसतिगृह प्रवेश योजनेद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम अशी शैक्षणिक वाटचाल घडवून आणली आहे. या योजनांमुळे ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करू लागल्या आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
0000
डी.एल.एड. परीक्षेचा निकाल जाहीर
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत
उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती


राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
बुधवार, दि. ६ ऑगस्ट, २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; नियमितपणे आढावा, समन्वय साधणार
मुंबई, दि. ६ : - राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील.
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे – श्री क्षेत्र भीमाशंकर (जि.पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा., श्री. क्षेत्र घृष्णेश्र्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी. श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरभ विजय. श्री. क्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) – वित्त विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती रिचा बागला. श्री. क्षेत्र परळी वैजनाथ (जि. बीड) – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव श्री. आप्पासाहेब धुळाज.
या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना उच्चाधिकारी समित्यांच्या बैठकांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १४८ कोटी ३७ लाख रुपयांच्या सुमारे ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्रीक्षेत्र घृष्णेश्र्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील २७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्री. क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५ कोटी २१ लाख रुपयांचा आहे. तर श्री श्रेत्र परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. अशा पद्धतीने विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
Thursday, June 22, 2023
जिल्ह्यात उद्योग उभारणी बरोबर दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी प्रकल्पांच्या कामांना गती दिली जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस