Friday, September 18, 2020

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

 पुणे दि.18:  पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

             विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे),  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला,  वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील 'कोरोना'चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा  व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने  गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही  त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. 

          राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोखणे सोपे होईल. 

               राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शहरी भागातील रुग्णालयांवर  ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण वाढू नये यासाठी ग्रामीण भागातच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच ऑक्सीजनयुक्त बेड, व्हेंन्टीलेटर व अन्य उपकरणे सुरळीत सुरु ठेवावीत. 

              आशा वर्कर व अंगणवाडी सेविका 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचे संरक्षण व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली.

            यावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना  वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे सांगून आवश्यक त्या सूचना केल्या. 

           जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील  कोरोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देवून ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.  

                                                                                 0000       






अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश प्रदान

    



पुणे दि.18:- पुणे जिल्हयातील अखिल भारतीय वारकरी मंडळ, हवेली तालुका कमिटीच्या वतीने 1 लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 साठी सुपूर्द करण्यात आला यावेळी मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे देहूकर व अन्य पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.

                                                                                   ००००

'कमवा व शिका' योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

 पुणे दि.18:- पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार  तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

  गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक वेतनही देण्यात येणार आहे.

                                                                                    








0000

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार

 पुणे,दि. 18 : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावात्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नयेयाची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे  निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 'कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी तसेच 'कोरोना'बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

          विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटीलसार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारणपदुमवनेसामान्य प्रशासन विभागाचे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणेपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळविभागीय आयुक्त सौरभ रावजमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमपिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमारजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादडॉ. सुभाष साळुंखेससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहिम सुरु केली आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीपदाधिकारीस्वयंसेवी संस्थाशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा असून या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                        'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नयेयासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावेकोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावेअशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.           

            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणालेकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे. जम्बो रुग्णालयातही बेड वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 'माझे कुटुंबमाझी जबाबदारी'  अभियानाचा तपशील व पुढील नियोजनसामाजिक कृतिशील समूह समितीऑक्सीजन पुरवठा नियोजनबेड उपलब्धतापुणे जिल्हयाची अनुमानित रुग्णसंख्येचा तपशीलअनुमानित बेड संख्येचा तपशीलआवश्यक असणा-या बेडसाठी प्रस्तावित उपाययोजनाव्हेंटीलेटर उपलब्धता आदी उपाययोजनांची माहिती दिली.

           जमाबंदी आयुक्त  तथा ससूनचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***









उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

 पुणे दि.18:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट  येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                            





0000

Friday, September 11, 2020

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे - उपमुख्यमंत्री अजित पवार









पुणे,दि. 11 : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले.


            पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


            पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी  विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतीमानता येण्याच्या दृष्टिने  विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे, असे त्‍यांनी सांगितले. विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकी दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील.


            जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 50 टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरुन कोरोना रोखण्‍यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


            रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन दोन्ही महापालिकांनी करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर पासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. हे अभियान सर्वांनी मिळून प्रभावीपणे राबवूया, असे आवाहनही त्यांनी केले.


            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असून गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची गरज भासत आहे, यासाठी आणखी बेड वाढविणे गरजेचे आहे. रुग्णांना तात्काळ बेड मिळवून देण्यासाठी बेड व्यवस्थापन प्रभावीपणे व्हायला हवे.


            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त  तथा ससूनचे समन्‍वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेड व्यवस्थापनाच्या दृष्टीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आल्याची  आणि तपासण्या वाढविण्यात आल्याची माहिती दिली.


            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.


                                                  000

Thursday, September 10, 2020

प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

 

            सोलापूर,दि.10: ग्रामीण भागात 108 व इतर रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा त्वरित मिळावी. प्रशासनाने प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

            आरोग्य विभागाच्या विविध बैठकांदरम्यान श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, लसीकरणांशी निगडीत शासकीय आणि खाजगी दवाखान्यांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

            यावेळी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुकाणू व संनियंत्रण समिती, नियमित लसीकरण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि आपत्कालिन वैद्यकीय सेवा समितीचा श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

            श्री. शंभरकर म्हणाले, रूग्णवाहिकांचा वापर पूर्ण सॅनिटायझर करून करा. रूग्णवाहिकेबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत, याची खबरदारी घ्या. रूग्णवाहिका वाढविण्यावर भर द्या. मातृ वंदना योजनेचे काम ग्रामीण भागात चांगले झाले आहे. नागरी भागातील लक्ष्यही त्वरित पूर्ण करा. गरीब रूग्णांपर्यंत पोहोचून त्यांना योजना समजावून द्या. एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने प्रयत्नशील रहावे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवा. यासाठी नेहरू युवा केंद्राची मदत घ्या. तरूणांमध्ये जागृती करा.

            लसीकरणाबाबत श्री. शंभरकर म्हणाले, सध्या सर्व भर कोविडवर असला तरी नियमित लसीकरण योग्य खबरदारी घेऊन करणे गरजेचे आहे. लहान मुलांवर भर द्या. गरोदर माता, बालके यांची काळजी घ्या. अनुभव संपन्न अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

            राज्य वैद्यकीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. बफर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून लसीकरण घ्या. 65 वर्षांवरील नागरिकांनी बाळाला लसीकरणाला घेऊन येऊ नये, याबाबत सूचना द्या. मिझल्स-रूबेला लसीबाबतही आढावा बैठका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्यात 108 च्या 35 रूग्णवाहिका असून यापैकी 19 कोविड रूग्णांसाठी तर 16 नॉन कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कोविड काळात 15934 रूग्णांना याद्वारे सेवा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

माता बाल संगोपन अधिकारी एस.पी. कुलकर्णी यांनी मातृ वंदना योजनेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 88 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात जास्त पंढरपूर तालुक्यात 102 टक्के, उत्तर सोलापूर 99 टक्के, दक्षिण सोलापूर 94 टक्के, माढा 90 टक्के काम झाले आहे. सर्वात कमी मोहोळ 75 टक्के, अक्कलकोट 83 टक्के, मंगळवेढा, बार्शी आणि करमाळा 84 टक्के, सांगोला आणि माळशिरस 85 टक्के काम झाले आहे. नगरपरिषद भागात मंगळवेढ्यात एकही नोंदणी नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आधारकार्ड जुळत नसल्याने 3270 जणांना लाभ देता आला नाही, त्यांचे आधारकार्ड पुन्हा नोंदणीचे काम सुरू असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

0000000

--