Monday, August 29, 2022

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

 

मुंबई, दि. २९ : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट ट्रेन) संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूम मधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो त्याचप्रमाणे लोकांना सुविधा देखील मिळण्यास उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.
आजच्या बैठकीत रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
बुलेट ट्रेन : भूसंपादन, मोबदला विषयक कामांना गती द्या
मुंबई ते अहमदाबाद अशी ५०८.१७ कि.मी. लांबीचा हाय स्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) असून यासाठी एक लाख 8 हजार कोटी खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण १२ स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील ४ स्थानके आहेत. मुंबईतील १ स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. यासाठी जपान सरकारने कर्ज दिले असून ५० टक्के खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर २५ टक्के वाटा महाराष्ट्र आणि २५ टक्के गुजरात सरकार उचलणार आहे. यासाठी एमएमआरडीए मधील ४.८ हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३० सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरण या बाबी देखील पालघर तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
मेट्रो मार्गासाठी भूसंपादन वेगाने करा
आजच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-३,४,५,६,९ आणि ११ यांचा त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग २ ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व), यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-४ तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-५ या मार्गांसाठी भूसंपादन व हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी इतकी वाढली असून या संदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी आणावा असे आदेश देतानाच त्यांनी वन विभागाशी संबंधित प्रलंबित बाबींही तातडीने निकाली काढण्याच्या सूचना वन विभागास दिल्या. या रेल्वे मार्गासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा वाटा राज्य सरकारने यापूर्वीच दिला आहे.
शिवडी-वरळी जोड रस्ता तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याला देखील वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एमटीएचएलचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
जलवाहिन्यांच्या कामाला गती द्यावी
सूर्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आली असून पुढच्या वर्षीपासून नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होईल. मात्र यासाठी वसई-विरार महानगरपालिका तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तातडीने जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा व इतर प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा
या बैठकीत पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा दोन महिन्यात सादर करावा, जेणेकरुन या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा देता येणे शक्य होईल. जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटन विभागाशी समन्वयाने या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अशाही सूचना देण्यात आल्या.
पुणे-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे
या मार्गाला निती आयोगाने देखील एप्रिल २०२२ मध्ये मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. यासाठी देखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वन जमिनीचे हस्तांरण या बाबींना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या व्यतिरिक्त पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो तसेच विमानतळ या कामांबाबत देखील या वॉर रुम बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले.
या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मध्य रेल्वे तसेच हाय स्पीड रेल कार्पोरेशनचे अधिकारी तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण महासंचालक वॉर रूम राधेश्याम मोपलवार यांनी केले
-----०-----

महा-ऊस नोंदणी’ॲपचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्धाटन ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल-सहकारमंत्री

 



पुणे, दि. २९: शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
साखर संकुल येथे साखर आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात ॲपच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सावे बोलत होते. याप्रसंगी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी आदी उपस्थित होते.
ऊसाचे क्षेत्र वाढत असताना या ॲपमुळे ऊस नोंदणीबाबतचा शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, असे सांगून सहकारमंत्री सावे म्हणाले, ऊस हे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. ग्रामीण भागात ऊस नोंदणीबाबत तक्रारी येतात आणि ऊसाची तोड होण्याबाबत शेतकरी चिंतेत असतात. या ॲपच्या माध्यमातून ऊसाची नोंद होणार असल्याने ऊस वेळेवर तुटण्यास मदत होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. यामध्ये एका कारखान्याव्यतिरिक्त अजून दोन कारखान्यांचा पर्याय दाखल करण्याची सोय असल्यामुळे ऊस तोडणीविषयी खात्री मिळेल, असा विश्वास श्री. सावे यांनी व्यक्त केला.
यावेळी आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली, साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी करणे शक्य होत नाही असे शेतकरी या मोबाईल ॲपमार्फत स्वत:च्या ऊस क्षेत्राची नोंद करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊस क्षेत्र नोंद केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या ॲपमध्ये दिसून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या ऊसाची नोंदणी करणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडुरंग शेळके, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे, संतोष पाटील यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक, श्री नाथ म्हस्कोबा कारखान्याचे शेतकरी व शेती अधिकारी उपस्थित होते.
*असे आहे‘महा-ऊस नोंदणी’ॲप*
‘महा-ऊस नोंदणी’ॲप वापरासाठी अत्यंत सुलभ असून आजपासून गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड करुन त्यावरुन आपल्या चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती भरावी लागेल.
ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल, या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील १०० सहकारी व १०० खासगी असे एकूण २०० कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकेल.
*मंत्री अतुल सावे यांच्याकडून साखर आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा*
‘महा-ऊस नोंदणी’ॲपच्या उद्घाटनानंतर झालेल्या बैठकीत श्री. सावे यांनी साखर आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील ऊस क्षेत्र, साखरेचे गाळप, साखर कारखाने, कारखान्यांकडून सुरू करण्यात आलेले इथेनॉल प्रकल्प, आसवणी, सहवीजनिर्मिती, काँप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प, साखर कारखान्यांपुढील आव्हाने, ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी), साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी), त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली एफआरपीची रक्कम आदींविषयी आढावा घेण्यात आला.
0000

Thursday, August 25, 2022

कार्ला येथील डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन आयुर्वेदातील संशोधनाद्वारे मानवजातीचे कल्याण साधता येईल –राज्यपाल



पुणे दि.२५: कार्ला येथील पद्मश्री श्रीगुरु डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. ऋषीमुनींनी दिलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला संशोधनाद्वारे अधिक पुढे नेल्यास आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धतीत संतुलन स्थापित होत मानवजातीचे कल्याण साधता येईल, असे प्रतिपादन श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.
मावळ तालुक्यात कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, बालाजी तांबे फाउंडेशनच्या अध्यक्षा वीणा तांबे, सुनिल तांबे, संजय तांबे, डॉ.मालविका तांबे आदी उपस्थित होते.
डॉ.बालाजी तांबे यांनी मानवजातीसाठी केलेले कार्य पुढे सुरू रहावे अशी अपेक्षा करून श्री.कोश्यारी म्हणाले, योग, ध्यान आदीसंबंधी भारतीय ज्ञान जाणून घेत आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास मानवजीवन सुखकारक होईल. आपल्या देशाचे हे भाग्य आहे की नवा आजार समोर येताच त्यावर उपचार पद्धती विकसित झाली आहे. धन्वंतरीपासून सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे.
भारतीय चिंतनाचे वेगळे महत्व आहे. इतर वैद्यकीय शाखा शरीराच्या आरोग्याचा विचार करतात, तर आयुर्वेद शरीरासोबत मानव जीवनाचा विचार करीत असल्याने त्याचे महत्व वेगळे आहे. उपचार आणि अध्यात्म याचा सुवर्ण संगम आयुर्वेदात आहे. जीवनात संतुलन असल्यास सर्व समस्यांवर मात करता येते. त्यामुळेच साधुसंतांनी स्वतःला ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला. या ज्ञानाची जोड देऊन आधुनिक उपचार पद्धतीदेखील अधिक प्रभावी होईल.
डॉ.बालाजी तांबे यांनी ही प्राचीन शिकवण अनुसरत आयुर्वेदाचे महत्व जगभरात पोहोचविले. या कार्याबद्दल समाज नेहमी त्यांचा ऋणी राहील. आयुर्वेद शरीरासोबत माणसाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास साधणारा असल्याचा संदेश डॉ.तांबे यांनी आपल्याला दिला आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
खासदार पाटील म्हणाले, डॉ.बालाजी तांबे यांनी समाजाला आयुर्वेदाची मोठी देणगी दिली. त्यांचे स्मारक संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा देईल.
खासदार बारणे म्हणाले, आयुर्वेदाच्या माध्यमातून माणसाला नवे जीवन देण्याचे कार्य डॉ. बालाजी तांबे यांनी केले. देशभरात कार्ला परिसराची ओळख आयुर्वेदासाठी आहे. हे कार्य पुढे सुरू रहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिले.
खासदार तटकरे म्हणाले, डॉ.बालाजी तांबे यांनी भारतातील आयुर्वेद उपचार पद्धती श्रेष्ठ ठरू शकते हे सिद्ध करून दाखविले. नव्या आजारांवर संशोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. हे संशोधन पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी संजय तांबे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. डॉ.मालविका तांबे यांनी बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
0000

हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामंजस्य करार दिशादर्शक ठरेल-विभागीय आयुक्त सौरभ राव



पुणे, दि. २५: हवामान बदलाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याबाबत करण्यात आलेला करार दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय विभागांनी सार्वजनिक हित लक्षात घेता अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विभागातील निकृष्ट, नापिक पडीक जमिनीच्या तुकड्यांचे पुनरुज्जीवन करून हरितीकरण करण्याकरिता वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम राबविण्यासाठी चौदा ट्रीज फाऊंडेशन व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त राव बोलत होते. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त पूनम मेहता, चौदा ट्रीज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण भागवत, संचालक किरण देशपांडे, एकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त अजय फाटक आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनासाठी या प्रकारच्या समग्र व बहुआयामी उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नापीक जमीनींना पर्यावरण पूरक बनविणे, कार्बन सिंक तयार करणे, हरित उपजीविका निर्माण करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
डॉ. भागवत म्हणाले, या कराराच्या माध्यमातून प्रशासनासोबत काम करण्याचे करुन निकृष्ट, अनुत्पादक जमिनीचे हरीत पट्ट्यामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न आहे. संस्था नागरिकांना हवामान विषयक बाबीमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल. चौदा ट्रीज फाऊंडेशनच्या आयआयटी कानपूर, एकॉलॉजिकल सोसायटीसारख्या नामांकित स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी संगितले.
या करारानुसार खेड तालुक्यातील ओसाड, नापिक, निकृष्ट व पडीक जमिनीवर स्थानिक पर्यावरणाशी सुसंगत असणाऱ्या वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे. पुनर्वनिकरणाद्वारे शाश्वत विकास करणे, कार्बन फुट प्रिंट तयार करणे, पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणे, भूजलाच्या पाण्याची पातळी वाढवून त्यातून जैवविविधता पुनर्संचयित करणे असा व्यापक दृष्टीकोन या करारामध्ये आहे. या कामाची सुरुवात वेताळे गावातून करून शेजारच्या गावांमध्ये त्याचा विस्तार करुन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करण्यात येणार आहे.

Sunday, July 10, 2022

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

 




'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण
सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :- आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर्षी १० लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
*समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार*
राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असेही त्यांनी सांगितले.
राज्यात यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
*राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा*
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
*वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण*
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगण' या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.
*निर्मल दिंडी पुरस्कार वितरण*
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच 'ग्रीन बिल्डिंग' पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.
प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.
यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, संजय(बंडू) जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकरी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
********

Tuesday, July 5, 2022

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत

 





 

 

 

पंढरपूर, दि.05 (उमाका):- श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले.

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.

तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

                 जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले पालखीचे सारथ्य

सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.

अकलूज नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत

अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्यावतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांच्यासह अकलूज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे  जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.

या रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते, पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

00000000

Monday, July 4, 2022

माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात आगमन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत

 


 पंढरपूर, दि.04 (उमाका): पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

                        चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥

                         डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥

                       संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥

 या संत तुकाराम महाराज अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

 यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ‌शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले.

कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.

 पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा  जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

00000