Friday, October 7, 2022

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला पुणे विभागातील कामाचा आढावा कामगार भवन बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे नियोजन करा- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 



पुणे, दि.७ : कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
साखर संकुल येथे आयोजित कामगार विभागाच्या पुणे विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक एम. आर. पाटील, अपर संचालक अ. धो. खोत उपस्थित होते.
कामगार भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडणे आवश्यक असून जागा निवडताना कामगारांची सोय पहावी. या इमारतीत जिल्हा कार्यालये व विभागीय कार्यालये अशी स्वतंत्र व्यवस्था असावी. शक्यतो एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भूमीपूजन या वर्षातच होईल असे नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करा असे डॉ. खाडे यावेळी म्हणाले.
कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पुणे विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयांची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे, वैयक्तीक प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना दिल्या.
मंत्री डॉ. खाडे म्हणाले, साखर कारखान्यातील कामगारांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. काही कारखाने बंद पडल्यामुळे कामगारांच्या देय रकमांबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील,
एमआयडीसी तसेच औद्योगिक क्षेत्राबाहेरीलही सर्व कंपन्या नोंदणीकृत असल्याबाबत खात्री करावी. नोंदणी न झालेल्या कारखान्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कामगारांच्या नोंदणीसाठी मोहीमस्तरावर काम करावे. एकही कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. कामगार नोंदणीबाबतच्या अडचणीही यावेळी मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या.
*ई-श्रम कार्ड नोंदणीला गती द्यावी*
श्री. खाडे यांनी ई-श्रम कार्ड नोंदणीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ई-श्रम नोंदणी काळाजी गरज असून प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्धरितीने पूर्ण करावी. नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे. यामध्ये केलेल्या कामाची नोंद अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात केली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.
*धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करा*
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचा आढावा घेताना डॉ. खाडे यांनी अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसचे कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवा अशाही सूचना दिल्या.
यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा, कामगारांची वैद्यकीय तपासणी, प्राणघातक अपघातांची माहिती, सानुग्रह अनुदान व नुकसान भरपाई आदींबाबत आढावा घेण्यात आला.
प्रधान सचिव श्रीमती सिंघल म्हणाल्या, कामगार कार्यालय आणि कामगार यांचा थेट संवाद असावा. मध्यस्थीला वाव देता कामा नये. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. वीटभट्टी कामगार, शेतात काम करणारे कामगार यांची ई- श्रम कार्ड साठी नोंदणी करा. प्रलंबित वैयक्तिक प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावीत असेही त्या म्हणाल्या.
अतिधोकादायक कारखाने, धोकादायक कारखाने, रासायनिक कारखाने आदी कारखाने असे एकूण १ हजार ५७६ कारखाने नोंदणीकृत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पुण्याचे कामगार उप आयुक्त, उपसंचालक बाष्पके, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी येथील सहायक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

Thursday, October 6, 2022

पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 





पुणे दि.६: नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.देवव्रत म्हणाले, हरितक्रांतीमुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ झाली. मात्र रासायनिक खतांचा उपयोग किती प्रमाणात करायचा हे न कळल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल आणि या समस्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे नैसर्गिक शेती व्यायसायिकदृष्टीने करून जमिनीची उत्पादनक्षमता वाढवावी आणि नैसर्गिक शेतीसाठी मार्गदर्शकांची साखळी तयार करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
*नैसर्गिक शेतीत सोप्या घटकांचा विचार*
जंगलात सर्व वनस्पतींना आवश्यक सेंद्रीय घटक पुरेशा प्रमाणात मिळतात. हेच तत्व अनुसरून नैसर्गिक शेतीचा विचार करण्यात आला आहे. नैसर्गिक शेतीत थोडे वेगळे तंत्र वापरण्यात आले आहे. यात बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, पीकांचे आच्छादन, वाफसा पद्धत, आंतरपीक आणि बहुपीक पद्धती, वाफे तयार करणे अशा सोप्या गोष्टींचा विचार यात आहे.
*शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती उपयुक्त*
खतांच्या अधिक वापरामुळे शेतीवरचा खर्च वाढला आहे. शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबला जात आहे. परदेशातून हे खत आयात केले जाते. शिवाय मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने आरोग्य सुविधांवरील खर्च वाढत आहे. याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होत आहे. हा खर्च कमी केल्यास देशाची वेगाने प्रगती होईल. नैसर्गिक शेतीमुळे हे सहज साध्य करता येईल. माझ्या स्वत:च्या शेतात अशा प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
*रासायनिक व जैविक शेतीत समस्या अधिक*
ग्लोबल वॉर्मिग, पाण्याचा अधिक वापर, जमिनीचा पोत बिघडणे, भूजलस्तर खालवणे, शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होणे, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अन्नसाखळीतून येणारे रासायनिक घटक मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. देशातील एकूण उपयोगात आणणारे रासायनिक खतांपैकी २५ टक्के वापर महाराष्ट्रात होत आहे. हरितक्रांतीपूर्वी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण २.५ टक्के होते, हे प्रमाण आता ०.५ टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे खतांचा अधिक उपयोग करूनही उत्पादन वाढत नाही.
आज जागतिक तापमानवाढीसाठी रासायनिक आणि जैविक शेती कारणीभूत आहे. जैविक शेतीत उपयोगात आणले जाणारे गांडूळ परदेशातून आलेले आहे. गहू आणि धान पिकाला एक एकरात ६० किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जैविक शेतीसाठी आवश्यक शेणखताच्या एक टनामध्ये २ किलो नायट्रोजन असते. त्यामुळे गरजेची पूर्तता करताना अधिक शेणखत वापरल्यास मिथेन वायू अधिक प्रमाणात तयार होऊन वातावरणातील तापमान वाढीला मदत होईल. म्हणून नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे राज्यपाल देवव्रत म्हणाले.
महाराष्ट्र ऐतिहासिकदृष्टीने, देशाला कृषि आणि आर्थिक क्षेत्रात पुढे नेणारे राज्य आहे. राज्यातील शेतकरी प्रगतीशिल आणि मेहनती आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर समस्या असल्याने त्यावर एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
*राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले,२०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल.
*नैसर्गिक शेती प्रकल्पास मुदतवाढ*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी २०१५-१६ मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये सुरू केलेले डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले. या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. यात अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यात येतील आणि नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल.
*नैसर्गिक शेतीचे उद्दीष्ट ठेवून गाव जलस्वयंपूर्ण करणार*
राज्यात मागील काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून रब्बीचे पीक वाढविण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली, २७ टीएमसी पाणी थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. हे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरुपात ही योजना आणली जाईल. पुढच्या टप्प्यात गाव जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी हे ध्येय ठेवून ही योजना राबवायची आहे.
*’स्मार्ट’ प्रकल्पाला गती देण्यात येईल*
मागील काळात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना सुरू केली. विविध गावांमध्ये केंद्रीत पद्धतीने राबविण्यास सुरुवात केले. जागतिक बँकेने साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी दिला. या मिशनला गती देण्याचे काम शासन करणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या १० हजार गावांमध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पावर २ हजार १०० कोटी खर्च करून व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार करून शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था, विविध श्रृंखला तयार करणे, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पालाही गती देण्यात येत आहे.
*पारंपरिक शेतीत चक्रीय अर्थव्यवस्था*
विविध माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषि सल्लागार म्हणून पाठविले. त्यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारीत असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे असे नमूद केले आहे. आपण नंतरच्या काळात अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलेल्या रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले, पण चक्रीय अर्थव्यवस्था मंदावली. निविष्ठा, त्यासाठी खरेदी आणि बाजारावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे शेतमालाचा भाव वाढताना उत्पादनखर्चही वाढत आहे. त्यामुळे शेती फायद्याची होत नाही.
*मानवजातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार आवश्यक-पालकमंत्री श्री.पाटील*
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुण्यातील शेतकरी प्रगतीशील आहेत. नैसर्गिक शेतीचे महत्व सर्वांना कळले आहे. रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खराब झाला आहे. शिवाय रासायनिक खतांमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रासायनिक खतांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आहे. नैसर्गिक शेती शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसोबतच माणसाच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची आहे.
राज्याच्या लोकसंख्येचा ५२ टक्के भाग शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करावे लागेल. या शेतीपद्धतीमुळे कमी झालेल्या उत्पन्नाचा काही भाग त्याला मदतीच्या स्वरुपात देण्याबाबतही विचार करावा लागेल. मानवजातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार करावा लागेल. नैसर्गिक शेती परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याविषयीची दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी परिषद उपयुक्त -कृषि मंत्री अब्दुल सत्तार*
कृषि मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी कृषि विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येईल. नैसर्गिक शेतीच्या सहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरविण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी कृषि विभागामार्फत राज्यात करण्यात येईल. सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येईल.
या प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीच्या विकासावर भर द्यावा लागेल, अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा लागेल, शेतकऱ्याला आर्थिक लाभाची हमी देणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. 'एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या आहेत. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
*भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित करणार- फलोत्पादन मंत्री श्री.भुमरे*
फलोत्पादन मंत्री श्री.भुमरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य फळे व भाजीपाला उत्पादन व निर्यातीमध्ये देशात अग्रेसर राज्य आहे. राज्याचे स्वंतत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे. देशाच्या निर्यातीमध्ये ६५ टक्के फळे, ५० टक्के भाजीपालाचा वाटा असून यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुधारित मनरेगा योजना घेण्यात आल्यामुळे फळपिकाखालील क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकाला सुरक्षितेची हमी देण्यासाठी नैसर्गिक शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. विषमुक्त फळे, भाजीपाला नागरिकाला उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागाचा विशेष भर आहे. विषमुक्त फळे, भाजीपाला यांना देशात बाजार व निर्यातीत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया संपन्न होत आहे. अपेडा या संस्थेमार्फत फलोत्पादन पिकाच्या निर्यातीत फळबागाची नोदंणी करण्यात येत आहे. २२ पिकांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे देशात राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येत्या काळात फलोत्पादन विभागातर्फे भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.डवले यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. किमान खर्चात अधिकाधिक उत्पादन देणे, विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्याला वळवायचे आणि निविष्टेचा खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येत आहे. फलोत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. निर्यातीतही ८ प्रकाराच्या कृषी उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. हरितक्रांतीनंतर किटकनाशकाच्या वापरामुळे पिकांची उत्पादकतेत स्थिरता आली आहे. जमिनीच्या पोषक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेतीचे महत्व पोहोचविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आयोजित नैसर्गिक शेती उत्पादने व प्रक्रिया पदार्थांच्या स्टॉल्सला मान्यवरांनी भेट देऊन शेतकरी, बचत गटांच्या प्रतिनिधींकडून उत्पादनांची माहिती घेतली.
०००

Thursday, September 29, 2022

...अन् वेदना विसरून विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर क्षणभर फुललं हसू बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

 



पुणे दि.२९: साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हात मायेने फिरला...घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले....आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं...शाळेने दिलेले संस्कार न विसरता मुलींनी याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं... जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले.....


आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची श्री.पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी श्री. पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.


आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी  अपघात झाला. दुर्घटनेत  किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.


शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत ‘खाऊ’ देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधताना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली. 


यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

000

Thursday, September 22, 2022

कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

 



मुंबई, दि. २२ : सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ - ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.
मंत्रालयातून मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे, ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री श्री. लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पठाराच्या पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे, त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चित वाव देण्यात येईल.
यावेळी आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच्या सुविधा मिळाव्या तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई - बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई - बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून अतिरिक्त ई - बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी श्री.जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
निसर्गरम्य कास पठार
सह्याद्री पर्वतरांगेत सातारा शहरापासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा कास पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विविधरंगी फुलांचा बहर सुमारे १० चौरस कि.मी. क्षेत्रावर पाहायला मिळतो. या पठारावर सुमारे ८५० वनस्पतींचे विविध प्रकार आणि फुलपाखरे आढळतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या प्रगतीनुसार पठार दर १५ - २० दिवसांनी रंग बदलत असते. अनेक स्थानिक व लुप्त होत चाललेल्या वनस्पती देखील इथे आढळतात. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ठेवा उपयोगी ठरेल. मागील काही वर्षांपासून हे कास पठार पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कास पठाराला हंगामात दररोज ३ हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात.
युनोस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भांडार असल्यामुळे येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटन विभाग पर्यावरणपूरक पर्यटन संकल्पनेअंतर्गत या हंगामा करिता ४ ई- बसेस सुरु करत आहे. या बसेस कासने गावापासून कास पाठरापर्यंत अर्धा कि.मी. पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसण्यास मदत होईल.
पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर सौंदर्याने बहरलेला असतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयना जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जलक्रीडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसित करण्यात येईल आणि त्यातून या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य देण्यात येईल.
*****

शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा -गिरीष महाजन



पुणे दि.२२:- शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार,अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार,सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ-सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांची अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मुलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. असे ते म्हणाले.
राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावाती प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून 'हर घर नल' संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यशासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचे सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी १७ उद्दिष्टांपैकी ९ उद्दिष्ट केंद्रीत करण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले.
राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पनेला विचार घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टावर आधारीत पोस्टर पुस्तिका व 'ग्राम विकासाचा रोड मॅप' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

Wednesday, September 14, 2022

'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन



तृतीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत परिषदेत सकारात्मक चर्चा
पुणे, दि. १४: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या बाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. सुरूवातीच्या कालावधीत सुमारे १३०० तृतीयपंथीय मतदार होते, आता ही संख्या ४ हजारापर्यंत आहे. मतदान प्रक्रियेत या घटकाचा सहभाग वाढयला हवा. तृतीयपंथीयांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मानसीक बदल आणि संवादाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समजून घेण्याच्या प्रक्रीयेद्वारे त्यांना मुख्य प्रवाहात घेणे अधिक सोपे जाईल. पोलीस विभागाकडून तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. सोनावणे म्हणाले, निसर्गामध्ये एकरूपता पहायला मिळते. मानवी जीवनात भेद निर्माण झालेले दिसतात. असे प्रश्न सोडविण्यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून विचारमंथन होणे महत्वाचे आहे.
झैनब पटेल म्हणाल्या, राज्यात ४ हजारावर तृतीयपंथीय मतदार आहेत, ही संख्या वाढायला हवी. यासाठी तृतीयपंथीय समूदाय सर्वतोपरी सहकार्य करेल.
यावेळी श्रीगौरी सावंत, सलमा खान यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
000

Wednesday, September 7, 2022

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे दि. ७ : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंती सोहळा कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चंद्रकांत बावनकुळे, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम- अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य काय असते ते दाखवून दिले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती होती. त्यांच्यामागे अठरा पगड जातीचे मावळे होते.
शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यकारभार करतांना त्यांनी सनद निर्माण केली. त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले.
*महामंडळासाठी १०० कोटी, स्मारकासाठी ५ कोटी देणार*
रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार श्री. पडळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे चंद्रकांत खोमणे, रमण खोमणे, तानाजी खोमणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
0000