Wednesday, April 26, 2017

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल राव यांच्या हस्ते डी. लिट




सोलापूर दि. 26 :  संघर्षमय जीवनातून राजकीय तसेच सामाजिक  क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविल्याबद्दल सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट पदवी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली
            सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष दीक्षांत समारंभास राज्यपाल श्री. राव यांच्यासह व्यासपीठावर सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कुलगुरु एन.एन. मालदार, परीक्षा नियंत्रक विभागाचे प्रमुख डॉ. बी. पी. पाटीलकुलसचिव पी. प्रभाकर उपस्थित होते.
            सुशीलकुमार  शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री, देशाच्या गृहमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. मिळालेल्या संधीचे सोने  करुन त्यांनी  सामान्य माणसासाठी काम करुन ओळख निर्माण केली, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.
            सत्कारास उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले, सोलापूर माझी जन्मभूमी आहे. सोलापूरच्या मातीने मला घडविले असून  सोलापूर विद्यापीठाने दिलेली डी. लिट पदवी माझ्या आईने दिलेली पदवी, असे मला गौरवाने म्हणावे वाटतेसोलापूर विद्यापिठाने अल्पावधीत केलेली शैक्षणिक प्रगतीही कौतुकास्पद आहे. विद्यापिठाचे संशोधनाच्या क्षेत्रात  होत असलेले काम समाधानकारक असून यापुढे त्यांनी वेगवेगळया संशोधनात भरीव काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीसोलापूर विद्यापीठामुळे येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळाला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली याचे समाधानही आपल्यास वाटते असेही ते म्हणाले.
            तत्पूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या बास्केटबॉल कोर्ट, व्हीव्हीआयपी अतिथी गृहाचे उद्घाटन आणि इलेक्ट्रॉनिक विभाग इमारत, बहुउद्देशीय सभागृह, आरोग्य केंद्र आणि 400 मीटर रनिंग ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.
            कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धराम म्हेत्रे, सौ. उज्वला शिंदे, विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी सन्माननीय नागरीक  उपस्थित होते.
0000
                                                            

                     


No comments:

Post a Comment