Thursday, November 23, 2017

राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे महामार्ग सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती


सोलापूर दि. 23 :-  राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले जाणार आहेत. या महामार्गाच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम भवनच्या कुमठा नाका येथील बांधकाम भवन येथे ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य अभियंता प्रविण भिडे, अधीक्षक अभियंता राजेश पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, येत्या दोन वर्षात रस्ते विकासाच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न आहे. बावीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग विकासातून आर्थिक प्रगती शक्य होईल. हे सर्व महामार्ग चार पदरी आहेत.भारतमाला प्रकल्पातून राज्यात 6500 किलोमीटरचे सहा पदरी रस्ते होणार आहेत.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील निवासी इमारतीचे बळकटीकरण करण्याचे धोरण आखत आहोत. यामुळे इमारतीचे आयुष्य आणखी दहा ते पंधरा वर्षे वाढेल अशी अपेक्षा असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत कपात केली जाऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत. ही विनंती मान्य झाल्यास भरघोस निधी मंजूर होईल. त्यातून प्रलंबित देयके देणे शक्य होईल, त्याचबरोबर नवीन कामांना निधी देणे शक्य होईल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. 15 डिसेंबर 2017 पूर्वी खड्डे मुजविण्याचे काम पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
टेंभुर्णी – करमाळा रस्त्यासाठी निधी मुजूर करण्यात आला आहे. सोलापूरच्या महसूल भवनाच्या फर्निचरसाठीही निधी दिला जाईल. कार्यालयीन इमारत पुर्ण झाल्यावर संबंधित विभागाकडे हस्तांतरीत केली जावी असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
******



No comments:

Post a Comment