Monday, November 20, 2017

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा डिजीटल होणे गरजेचे : सहकारमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन




सोलापूर दि. 20  :- शालेय शिक्षणात गुणवत्ता वाढावी, शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी शाळा 100 टक्के डिजीटल होणे गरजेचे आहे. शाळा डिजीटल होण्यासाठी यामध्ये लोकसहभाग वाढावा, असे प्रतिपादन  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री  सुभाष देशमुख यांनी आज येथे केले. 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळेंच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झाली, यावेळी सहाकरमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी पंचायत समिती उत्तर सभापती  श्रीमती संध्याराणी पवार, दक्षिण  सोलापूर पंचायत समितीचे  उपसभापती संदीप टेळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्यासह  उत्तर व दक्षिण सोलापूर मधील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सहकार मंत्री देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार शाळेत मिळतात. त्यांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असतो. त्यामुळे प्राथमिक - माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मुलांना अद्ययावत व चांगले शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटल असणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी आपली शाळा डिजीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामी गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी  त्यांनी प्रयत्न करावेत, असे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. शाळा डिजीटल होण्यासाठी पत्येकाला शाळा माझी वाटली पाहिजे यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे असे ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले, चांगले विद्यार्थी घडवण्याची किमया शिक्षकांकडे असून आजचे विद्यार्थी हे उद्याच्या वैभवशाली राष्ट्राचे कर्ते आहेत. या विद्यार्थ्यांना चांगली स्वप्ने पाहण्यास व उच्च ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळे प्रयोग होणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी  शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या  तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी ‘सोलापूर फौंडेशन’ची स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा 100 टक्के डिजीटल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी मुख्याध्यापकांना केल्या.
गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात शाळा सिध्दी उपक्रमाबाबत माहिती दिली. विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी आभार मानले.
*****



No comments:

Post a Comment