Wednesday, January 17, 2018

पारदर्शकतेबरोबरच कामांची गती वाढविण्यावर भर द्या -विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी


पुणे दि. 12: ग्रामपातळीवर निधी अभावी प्रलंबीत असणाऱ्या कामांशी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची योग्य सांगड घालून अशी सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत. कोणतेही शासकीय काम करताना पारदर्शकतेला महत्व आहेच, मात्र त्याबरोबरच अशा कामांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज दिल्या.
            येथील उपायुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (रोहियो) जयंत पिंपळगावकर, उपसचिव (रोहियो) प्रमोद शिंदे, विनयकुमार आवटे, गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सिटीझन इनफॉरमेशन बोर्डचे चिराग धुम, सुचरिता थोरात उपस्थित होते.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, या विभागीय स्तरावरील गुड गव्हर्नन्सच्या कार्यशाळेच्याधर्तीवर तालुकास्तरापर्यंत कार्यशाळा व्हाव्यात, या माध्यमातून ग्रामपातळीवरील शासनाच्या सेवकांना याचे ट्रेनिंग मिळावे. ग्रामपातळीवर अनेक कामे आहेत, या कामासाठी निधी हवा आहे. मनरेगामध्ये निधीची कोणतीही कमतरता नाही. अशा कामांना मनरेगाच्या कामांत अंतर्भुत करावे, त्यामुळे ही कामे मार्गी लागतील. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे कशी करता येतील यावर भर द्यावा. मनरेगाच्या कामांचे पुढील वर्षीचे नियोजन करताना त्यामध्ये काय नावीन्यपूर्ण करता येईल याची चर्चा करावी. मनरेगाचा फायदा विभागातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            या कार्यशाळेत प्रमोद शिंदे, श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सुचरिता थोरात, श्री  काकडे, संदीप कोहिनकर, शैलेश सुर्यवंशी, चिराग धुम, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत पिंपळगावकर यांनी केले. सूत्र संचालन विनयकुमार आवटे यांनी केले. तर आभार सुचरिता थोरात यांनी मानले. या कार्यशाळेला पुणे विभागातील मनरेगाचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगाचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.
*****


No comments:

Post a Comment