Wednesday, January 17, 2018

पंचायत राज व्यवस्थेच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी






§  विभागीय परिषदेचे शानदार उद्घाटन.
§  परिषदेत मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
§  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 300 प्रतिनिधींची उपस्थिती.
पुणे दि. 17 : पंचायत राज व्यवस्थेच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशैलीत अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित विभागीय कार्यशाळा ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासह स्थानिक स्वराज्य संस्थांची पुढील दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज व्यक्त केले. 
73 व्या घटना दुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)च्या संवाद सभागृहात राज्य निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती व पुढील दिशा या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घान प्रसंगी श्री. दळवी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शमिका महाडीक, ग्रामीण विकास विभागाचे माजी सचिव सुधीर ठाकरे, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते.
श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य स्थापनेनंतर लगेचच महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अधिकार दिले. राज्य निवडणूक आयोग ही याच घटनादुरूस्तीची देण आहे. या घटनादुरूस्तीमुळेच ग्रामसभांना घटनात्मक दर्जा दिला. ग्रामीण भागातील जीवन सुखकर होण्यासाठी पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित विभागीय परिषदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रगती आणि पुढील दिशा निश्चित होण्यास मदत होणार आहे.



श्री. विश्वासराव देवकाते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण विकासाच्या पाया आहेत. ही पंचायत राज्य व्यवस्था बळकट असेल तरच देशाचा विकास होणार आहे. 73 व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक अधिकार दिले आहेत. या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित  विभागीय परिषदेचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी केले. या कार्यशाळेला विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुमारे 300 प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
*****






No comments:

Post a Comment