Monday, January 22, 2018

“झिरो पेन्डन्सी” चा शासननिर्णय लवकरच निर्गमीत - मनूकुमार श्रीवास्तव


पुणे दि. 22 : शासन यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी झिरो पेन्डन्सीहे प्रभावी साधन ठरणार आहे. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून पुणे विभागात याची चांगली अंमलबजावणी झाली आहे. राज्यातील सर्व विभागांत हा उपक्रम राबविण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रीया सुरू असून लवकरच झिरो पेन्डन्सीचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिली.    
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सांगलीचे जिल्हाधिकारी व्हि. एन. कळम-पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पुणे विभागातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   
श्री. मनूकुमार श्रीवास्तव म्हणाले, झिरो पेन्डन्सी हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयात कामाचे वातावरण तयार होते. मात्र या उपक्रमांच्या अंमलबजावणीत सातत्य राहण्याची आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाला प्रत्येक वर्षी त्यांच्याकडील असणाऱ्या जबाबदारीतील पेन्डन्सीचा अहवाल जोडणे अनिवार्य करून त्यावर त्यांच्या कामांचे मुल्यांकन करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा उल्लेख झिरो पेन्डन्सीच्या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात येईल.
तसेच शासनाने प्रत्येक जिल्ह्यांना नेमून दिलेले महसूलाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात अनाधिकृत गौण खनिजांच्या उत्खननावर जोरदार कारवाई करण्याच्या सूचना श्रीवास्तव यांनी दिल्या. तसेच शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे विभागातील सर्व कामांचा आढावा दिला. तसेच झिरो पेन्डन्सीच्या अंमलबजावणीच्या माहितीचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर श्री. मनूकुमार श्रीवास्तव यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची पहाणी केली. तसेच झिरो पेन्डन्सी अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभिलेख कक्षांची पहाणी केली. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच झिरो पेन्डन्सीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

*****









No comments:

Post a Comment