Monday, March 5, 2018

खडकवासला धरण पुनरूज्जीवनासाठी माजी सैनिकांच्या ग्रीन थंब संस्थेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटींचे अर्थसहाय्य विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण




पुणे, दि. 5 : खडकवासला धरण पुनरुज्जीवनासाठी ग्रीन थंब या माजी सैनिकांच्या संस्थेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटीं रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. हा दीड कोटी निधीचा धनादेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या वेळी पाटबंधारे विभागाचे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार, शाखा अभियंता पी. डी. शिंदे, माजी सैनिक प्रकाश सावंत, राजेंद्र सोनवणे, सुभाष आवजी उपस्थित होते. 
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रीन थंब संस्थेने खडकवासला धरणातून सुमारे 10 लाख ट्रकहून अधिक गाळ काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. ग्रीन थंब संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, राष्ट्रीय सेवा योजना, पुणे विद्यापीठ, ॲमानोरा पार्क टाऊन, श्रीमती शोभाताई धारीवाल आरएमटी फाऊंडेशन, कमिन्स इंडिया पुणे, टाटा मोटर्स पुणे, प्राज फाऊंडेशन पुणे आणि पुणे महानगरपालिका, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने आजपर्यंत खडकवासला धरणातून सुमारे 10 लाख ट्रक गाळ, राडा रोडा, झाडे झुडपे, वाळलेले वृक्ष काढून गाळ शेतकऱ्यांना व गरजू पुणेकरांना मोफत वाटप केले व उर्वरित गाळ धरण तलावावर टाकून त्यात अंदाजे पाच लाख झाडे लावली.
पाटबंधारे खात्याची जमिनीवरची अतिक्रमणे काढून भविष्यात अतिक्रमणे होवू नये म्हणून तारेचे कुंपण घालून शासनाच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या जागा संरक्षित केल्या आहेत. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून अनेक लहान-मोठी कामे या संस्थेने केली आहेत. तलावाच्या बाजून झाडे झुडपे व छोटी पठारे निर्माण केल्यामुळे तलावाच्या परिसरात पक्षांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत दळवी म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधरे विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन थंबसह विविध संस्थांनी गाळ मुक्त धरण योजनेत अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. या कामामुळे खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढेल, याचा भविष्यात सर्व पुणेकरांना फायदा होईल व पाणीटंचाईला मात देण्यास मदत होईल.
*****



No comments:

Post a Comment