Saturday, November 24, 2018

डिजीटल कनेक्टीविटीच्या माध्यमातून गावांना थेट मंत्रालयाशी जोडणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. २४: ग्रामविकासाच्या माध्यमातून देशाच्या विकासाची दिशा ठरत असते.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य समन्वय करून गावांनी आपला विकास साधावा. सध्याच्या युगात फिजीकल कनेक्टीविटी बरोबरच डिजीटल कनेक्टिविटीची आवश्यकता असून या माध्यमातूनच गावांना थेट मंत्रालयाशी जोडणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच सरपंचांच्या मानधन वाढीबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आळंदी येथील ८ व्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप धाडीवाल, जैन इरिगेशनचे अतुल जैन, सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संचालक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सरपंच महापरिषद हा राज्यातील चांगले काम करणाऱ्या सरपंचांना एकत्र करून चर्चा, संवाद आणि अभिसरण करणारा चांगला मंच आहे. या माध्यमातून राज्यातील सरपंचांना चांगले काम करण्याची दिशा मिळेल. महात्मा गांधी, संत तुकडोजी महराजांसारख्या अनेक विभुतींनी ग्रामविकासाची संकल्पना मांडली. ग्राम विकास हाच देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या आठ वर्षातील पाच वर्षे राज्यात दुष्काळाची ‍स्थिती आहे. यावर्षीही राज्यातील २६ जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
            पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाव्दारे इस्त्राईल सारख्या देशाने क्रांती करून दाखवली आहे, त्याचधर्तीवर आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यात गेल्या चार वर्षात मोठे काम झाले आहे. १६ हजार गावात ५ लाख जलसंधारणाची कामे झाली आहेत. मात्र महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याला मर्यादा आहेत. तरीही या योजनेच्या माध्यमातून मोठे संचित आपण साध्य केले आहे. 
२०१३-१४ साली १२४ टक्के पाऊस होवूनही आपली उत्पादकता १३७ लाख मेट्रीक टन इतकीच होती, तर गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी पडूनही आपली उत्पादकता ही १८० लाख मेट्रीक टनापर्यंत गेल्याचे सांगत ही जलयुक्त शिवार योजनेची सफलता असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
         जलसंधारणाच्या कामांबरोबरच शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्याचा भाग म्हणून उन्नत शेती, समृध्द शेती, गट शेती यांसारख्या योजना आपण प्रभावीपणे राबविल्या आहेत. कृषी क्षेत्रातील हरवलेले पारंपारिक कौशल्य शोधून निसर्गाशी संवाद साधण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
         कोणत्याही आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम असून विविध माध्यमातून ४८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तीन वर्षात १ लाख ४० हजार शेततळ्यांची निर्मिती करून ५ लाख एकराच्यावर सिंचन निर्मिती करण्यात आली आहे. ५ लाख लोकांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. दीड लाख सिंचन विहिरींची निर्मिती करण्यात आली आहे. कृषी फिडर सौर ऊर्जेवर टाकण्याचे काम सुरू असून या माध्यमातून शेतकऱ्यांना विनाखंडीत १२ तास विज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शासनाची साडे चार हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
       राज्यातील विविध सरकारी जागांवर असणारी अतिक्रमणे नियमित करण्याचा शासन आदेश काढण्यात आला असून या माध्यमातून प्रत्येक गावांनी आपल्या गावातील सर्व अतिक्रमणे नियमित करून घ्यावीत. या जागांवर असणारी कच्ची घरे पक्की करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक सरपंचांनी आपले गाव बेघरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे.२०२१ पर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला घर मिळणार आहे.
       ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबद्दल एशियन बँकेने समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पेय जल योजनेव्दारे राज्यातील २५ हजार गावांत पाणी पोहोचविण्यात आले आहे. एक वर्ष आधीच राज्य हागणदारीमुक्त झाल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निधी या योजनेंतर्गत आपल्याला दिला आहे. यापुढे सर्व पेयजल योजना सौरऊर्जेवर करण्याचा शासनाचा विचार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
       राज्यातील १५ हजार ग्रामपंचायती भारत नेटच्या माध्यमातून फायबर नेटव्दारा जोडण्यात आल्या आहेत. २६ जानेवारीपर्यंत १० हजार गावांना डिजीटल कनेक्टीविटीने जोडण्यात येणार आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव थेट मंत्रालयाशी जोडण्यात येणार असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
         यावेळी श्री. प्रतापराव पवार, प्रदीप धाडीवाल, अतुल जैन यांची भाषणे झाली.
            यावेळी फोर्स मोटर्सच्यावतीने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर लकी ड्रॉची सोडत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या श्री. बिंटू पंढरीनाथ भोईटे रा. हिवरखेडे ता. चांदवड, जि. नाशिक यांना हे ट्रॅक्टरचे बक्षीस मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. 
     या सरंपंच महापरिषदेला राज्याभरातून सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****







No comments:

Post a Comment