Friday, August 28, 2020

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

        पुणे, दि. 28 :  कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.  कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ.दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे.  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी  दिले.

             कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टिने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

        प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर, संपर्क व्यक्ती शोध, प्रतिबंधित क्षेत्र, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता, 60 वर्षेवरील व सहव्याधी सर्व्हेक्षण, रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार  सुविधाही पुरेशा प्रमाणात असल्याचे  सांगितले.

                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

            पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***

No comments:

Post a Comment