Tuesday, February 19, 2019

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चित फायदा होईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






महायोजना शिबिराचे उद्घाटन

पुणे,दि.19 -एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.                   
 कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबीर 2019 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते .  
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ,खासदार अनिल शिरोळे, . प्रा. मेधाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.
   ग्रामीण भागामध्ये योजनांची शिबिरे आयोजित केली जातात.  शहरी भागांमध्ये अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकाना लाभ देण्यासाठी मेधाताईंनी कोथरूड भागामध्ये या शिबिराचे आयोजन केले आणि या शिबिराला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय,ही आनंदाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे  म्हणाले, प्रत्येकाला आवश्यक असलेल्या योजनांचा स्टॉल याठिकाणी आहे. समाजातील सर्व घटकांकरिता योजना आहेत. सर्व स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, यावरूनच लोकांना या शिबिराची आवश्यकता होती, मात्र  व्यवस्था नव्हती . आज या शिबिरामुळे ती व्यवस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचे कल्याण त्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे शासनाचे नियोजन आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाच्या घरात पोहोचला, तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळाल्या आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. प्रकल्प मार्गी लावून त्या प्रकल्पाला निधी देण्याचे  काम शासनाने केले आहे. येत्या तीन ते चार वर्षात पुणे शहर सर्वोत्तम शहर असेल. पुण्याचा बदललेला चेहरा येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
   महायोजना शिबिराच्या माध्यमातून ज्या लाभार्थींनी योजनांसाठी अर्ज केला असेल त्यासाठी आलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या बरोबर राहील,असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना . मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महायोजना शिबिराच्या माध्यमातून विविध योजना एकाच छाताखाली आणण्याचा प्रयत्न असून या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
     महायोजना स्थळी नवीन मतदार नाव नोंदणी,  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी श्रावण बाळ योजना, राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना,  नोकरदार महिला वस्तीगृह योजना,   उज्वला योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी योजनाबाबत माहिती लाभासाठी  स्टॉल लावण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, युवा कल्याणकारी योजना, दिनदयाळ अंत्योदय  योजना  या योजनांसंदर्भात सविस्तर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. योजनांची माहिती लाभाची नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायोजना शिबिरातील स्टॉलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                            ०००००

बांधकाम कामगारांना हक्काचे घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ













पुणे दि. 19-  राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            येथील शेती महाविद्यालयातच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवड चे महापौर राहुल जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीना, रेराचे अध्यक्ष गौतमकुमार चटर्जी आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. मात्र या कामगारांची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. आमचे सरकार बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल.
            अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना  हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षात सर्वांना घरे देण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधीची कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
             कामगारांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना आखण्यात आली आहे.बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधान सचिव राजेशकुमार मिना यांनी प्रास्ताविक केले. कामगार आयुक्त राजीव जाधव.यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.


अडीच लाखाची शिष्यवृत्ती मिळाल्याने पी एच डी झालो
        कामगारांच्या मुलाला संशोधनासाठी अडीच लाखाची शिष्यवृत्ती उपलब्ध करुन दिल्यामुळे मी पी.एच.डी करु शकलो. वंचित व गरीब मुलांसाठी अनेक योजना आहेत. कोणत्याही घटकातील मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकतो, मात्र त्यासाठी शासनाचे पाठबळ हवे असते. मला शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मी संशोधन करु शकलो नसतो असे सोलापूरच्या अनिल झेंडेने यावेळी सांगितले.
            कामगार विभागाने माझ्या गुणवत्तेची कदर करुन मला शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.


*****

जुन्नर परिसराच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस











२८० कोटी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ

            पुणे, दि. १९: जुन्नर तालुक्यातील दाऱ्या  घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले. 
            हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर  येथे करण्यात आला,त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
     कार्यक्रमास  पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, पत्रकार उदय निरगुडकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे म्हणाले ,जुन्नर तालुक्यात  मोठी अर्थव्यवस्था निर्माण होऊन वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यासाठी आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यात आला आहे.  यासाठी आराखडा तयार करण्यात येईल.
      तालुक्यातील बुडीत  बंधाऱ्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.  अष्टविनायक हे आपले वैभव आहे. अष्टविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील,असे सांगितले.
    या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
            खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे  यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्य्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.    कार्यक्रमाला परिसरातील नागरिक,सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ठळक वैशिष्ट्ये: 
            प्रकल्पातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर,
 लेण्याद्री व थेऊर या सहा अष्टविनायक तीर्थक्षेत्र जोडणा-या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग आहे.
            दरवर्षी या रस्त्यांवरून १० लक्ष भाविक यात्रा करतात. हे रस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत.
            या रस्त्यांवर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान, बारामती तालुक्यातील मोरगाव, दौंड तालुक्यातील पाटस दौंड मार्गे सिध्दटेक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, जुन्नर तालुक्यातील ओझर व लेण्याद्री व हवेली तालुक्यातील थेऊर ही महत्त्वाची तीर्थस्थाने व बाजारपेठेची गावे आहेत.
            या रस्त्यांवर वाहतूक वर्दळ बऱ्याच प्रमाणात असते व त्यामानाने डांबरी पृष्ठभागाची रुंदी अपुरी पडते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे.  या भागातील पर्यटन व शेतीमालाच्या वाहतुक वाढीस चालना मिळणार आहे.
           या प्रकल्पामुळे जेजुरी, मोरगाव, सुपे, पाटस, दौंड, सिध्दटेक, पारगाव, न्हावरा, रांजणगाव, मलठण, 
पारगाव शिंगवे,नारायणगाव, ओझर, ओतूर, लेण्याद्री, जुन्नर, लोणीकंद, केसनंद, थेऊर ही गावे व तालुक्याची ठिकाणे एकमेकांशी ७.०० मीटर व १.०० मीटर रुंदीच्या दुपदरी डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत.
    या प्रकल्पामधील सितवाडी, बनकर फाटा, ओतूर ही गावे रा.म.मा. २२२वरील असून ओझर व लेण्याद्री येथे जाण्यासाठी तसेच मुंबईहून कल्याण मार्गे येणारी औद्योगिक अवजड वाहतुकीत नारायणगाव ते रांजणगाव मधील एम.आय.डी.सी. क्षेत्रांना जोडणारा जवळचा थेट मार्ग आहे.
     या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेले रस्ते रा.म.मा. २२२ (नगर -कल्याण), रा.म.मा. ७५३ (पुणे औरंगाबाद) रा.म.मा. ६५(पुणे- सोलापूर) व रा.म.मा. ५०(पुणे- नाशिक) तसेच नव्याने घोषित झालेले तळेगाव चाकण- शिक्रापूर- न्हावरा -ईनामगाव रा.म.मा. ५४८ डी (तळेगाव जामखेड -नांदेड) मनमाड -शिर्डी- अहमदनगर- दौंड- बारामती या रा.म.मा. १६० या सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे.
    या पर्यायी रस्त्यांमुळे पुणे शहरातील वाहतुकीचा भार कमी होऊन हे मार्ग अष्टविनायक परिक्रमा मार्ग म्हणून वापरात आहे.
            हा रस्ता भविष्यातील वाहतूक वर्दळ लक्षात घेता सन २०३३ पर्यंत (१५ वर्षे) पुरेसा पडेल, असे गृहीत धरून रस्ता संकल्पित करण्यात आला आहे.
**
            

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस











पुणे दि. १९ : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषीत, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
      किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
            यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अभिवादन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. 
             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात मॉ जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली.
             छत्रपतींच्या प्रेरणेनेच शासनाने विविध प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरीत केसेस मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे.   
            महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देवू शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
      शासनाच्यावतीने खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगत त्याच धर्तीवर राज्यातील इतर महत्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सूरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवनेरीच्या पर्यटन विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
      सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्माच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशातील महिलांनी शिवछत्रपतींची महिती सांगणारा पाळणा म्हटला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची पालखी आपल्या खांद्यावर घेत काही अंतर पार केले. यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेझिम पथकाच्यावतीने पारंपारिक लेझिम खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्यावतीने राष्ट्रगीत सादर केले. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
      शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्यावर आले होते.
०००००