Monday, July 6, 2020

सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा-पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा, दि. 6 (जिमाका) :  मागील वर्षीच्या पुरपरिस्थितीत  सातारा तसेच सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते, जीवित हानीही झाली होती. या वर्षीमात्र कोणत्या धरणातून किती विसर्ग केला जाणार आहे, याची पूर्व कल्पना विविध माध्यमातून पुराचा प्रादुर्भाव होणाऱ्या सातारासह, सांगली जिल्ह्यातील यंत्रणा, लोक प्रतिनिधी तसेच  गाव पातळी पर्यंत  देण्यासाठी उत्तम समन्वय असलेली सक्षम यंत्रणा उभी करावी अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
      आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना व धरणातील पाणीसाठा,  पूर परिस्थिती नियोजनाबाबत बैठक पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,  सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री मिसाळ  लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  पुर रेषेच्या आत ज्यांची घरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीसा द्या, संभाव्य धोक्याची माहिती देवून त्यांचे स्थलांतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील 6 गावे व कराड तालुक्यातील 9 गावे पुराच्या प्रादुर्भावात मोडतात  या गावांना आत्तापासूनच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच वीर धरण भरल्यानंतर नीरादेवघर आणि भाटघर धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवा आणि त्या प्रमाणे जनतेला अलर्ट करा. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या पुलावरुन वाहतूक व पायी जणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोडकळीस आलेल्या  किंवा जुन्या घरात जे नागरिक राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या
*पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये*
आपत्तीच्या कालावधीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने अफवा पसरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट करावे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. पुर व पावसामुळे  संभाव्य आपत्ती  झाल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला 1077 या टोल फ्री क्रमांकावर  त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
*नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण*
भीमा खोऱ्यात येणाऱ्या आणि कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या सर्व धरणासाठी पूर नियंत्रण अधिकारी नियुक्त केले असून या सर्वांबरोबर  उत्तम समन्वय  ठेवून काम करा, जेणे करून वेळच्या वेळी पाण्याचा विसर्ग होईल आणि लोकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी 24 तास दक्ष राहा अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.
*कोरोना संसर्गामुळे अधिक बाधीत झालेल्या गावांमध्ये कॅम्प लावून तपासणी करावी*
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जी गावे अधिक बाधीत झाली आहेत, अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने कॅम्प लावून गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. मोटार सायकलवरुन डबलसीट जात असले तर अशांवर कारवाई करावी. तसेच मास्क न लावता बाहेर फिरत असतील तर अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी केल्या.
कारोना झालेल्या बाधितावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जवळपास सर्वांना आता उपचार घेता येणार आहे. तसेच लक्षणे असलेल्या व लक्षणे विरहित रुग्णांची विहित केलेल्या दिवसाला 6 मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी त्यामुळे त्यांची शारिरीक क्षमता लक्षात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.
00000

Sunday, July 5, 2020

पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 33 हजार 857 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 05 :- पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 33 हजार 857 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 291 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 617 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, मृत्युचे प्रमाण 3.62 टक्के तर ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.08 टक्के इतके असल्याची  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 28 हजार 47 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 16 हजार 723 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 467 आहे. कोरोनाबाधित एकूण 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.62 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 971 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 767, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 101, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 304 रुग्ण असून 784 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 465 आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 3 हजार 102 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 834 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 979 आहे. कोरोना बाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 463 रुग्ण असून 262 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 941 कोरोना बाधीत रुग्ण असून 738 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 191 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 2 हजार 407 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 97 हजार 617 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 760 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 63 हजार 434 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 33 हजार 857 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 5 जुलै रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

Friday, July 3, 2020

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पुणे येथे कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक                           
  कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय   
            पुणे, दि.3 : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. 
      राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखालीझाली यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह कृषी परिषदेचे संचालक उपस्थितहोते.            
       नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठाच्याअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होणार आहे तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. त्यानुसार साकोली मध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला आज मंजुरी देण्यात आली.  अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
      या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतू कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाविचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. राज्यातील दोन वर्ष कालावधी व तीन वर्ष कालावधी च्या पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या एकूण दहा हजार विद्यार्थ्यांचा समावेश या निर्णयात होणार आहे. या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षातील मिळालेल्या गुणांच्या सरासरी वर आधारित गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. यानिर्णयाचा फायदा राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे, असल्याचे ही कृषी राज्यमंत्री श्री कदम यांनी सांगितले.
*****

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी - उपमुख्‍यमंत्री पवार

पुणे, दिनांक 3: पाचगाव पर्वती येथील  तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली.

यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, नगरसेवक सर्वश्री आबा बागूल, आश्विनी कदम, सुभाष जगताप, माजी नगरसेवक आणि इतर  पदाधिकारी उपस्थित होते.

            पुणे जिल्‍ह्याच्‍या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्‍पष्‍ट करुन उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले,  पुणे शहराच्‍या दृष्टिने चांगल्‍या गोष्‍टी व्‍हाव्‍यात, या मताचा मी आहे. पाचगाव पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्‍यास नागपूर येथील महाराष्‍ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजुरी घेण्‍यात आलेली आहे. या आराखड्यासाठी राज्‍य शासनाच्‍यावतीने 13 कोटी रुपये उपलबध करुन दिले जातील.

            यानंतर बैठकीत सेनापती बापट रोड ते पंचवटी पर्यायी रस्‍ता, मॉडर्न कॉलेज येथील पर्यायी रस्‍त्‍याबाबतही चर्चा झाली. यावेळी आमदार सिध्‍दार्थ शिरोळे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम,  पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रदेश विकास प्राधीकरणाचे महानगर आयुक्‍त विक्रमकुमार,  अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते. 

0000

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,दि.3 : पुणेपिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक कराअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते  बोलत होते.
             बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहतासार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यासवैद्यकीय शिक्षणअन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जीमहापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमजिल्हाधिकारी नवल किशोर रामपुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाडपिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकरपोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशमसंदीप बिष्णोईसाखर आयुक्त सौरभ रावपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमारसहकार आयुक्त अनिल कवडेपशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंगभूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  संचालक कौस्तुभ दिवेगावकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालशांतनु गोयलपोलीस अधीक्षक संदीप पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादसंचालक डॉ. अर्चना पाटीलससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नयेकाही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा  डॉक्टरांवर कारवाई करालॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे.  ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईलयासाठी योजना तयार करा.  शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
            सोलापूरसांगली  व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकानी कामगाराची राहण्याची करावी. तसेच काम करीत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यासहात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावेअसे आवाहनही  उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
          मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले,  पुणे महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्याया गोष्टी करतांना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत कराकोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाण्यांचे चाचण्यांचे प्रमाण  वाढवात्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त कराजेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी कराकोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु कराआरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करायासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी कराअशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार कराअशा महत्त्वपूर्ण सूचना  मेहता यांनी केल्या.
      कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होत आहे किंवा कसे याकरीता एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही  मेहता यांनी केली.
          बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थिती सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये बाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू दरचाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजनआरोग्य सर्व्हेक्षणमास्कपीपीई कीटआयसीयूऑक्सीजनयुक्त खाटा आणि श्वसनयंत्रे ( व्हेटिंलेटर) इत्यादी विषयी माहिती दिली.
     विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू दरनमुना चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजनरुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा या बाबतची माहिती दिली.  कोरोना बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी अँटीजेन टेस्ट कीटचा वापर करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षणघेण्यात येणारी दक्षताप्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली.  जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येतेअसे सांगितले.
            पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या-त्यांच्या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
***

Thursday, July 2, 2020

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसन तसेच कोरोना संदर्भातील आढावा

          पुणे,दि.2: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसनाशी निगडीत प्रश्न तसेच प्रकल्पामुळे प्रलंबित असलेल्या विविध विषयांचा आज सविस्तर आढावा घेतला. पुणे जिल्हयातील मदत व पुनर्वसन विषयक सर्व प्रश्न प्राधान्यांने सोडविणार असल्याचे सांगितले.  प्रकल्पनिहाय प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व मान्सून तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे  आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
        मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, पुणे शहरी तसेच ग्रामीण भागात ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाय योजना करा, तसेच संभाव्य दरड प्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबतही शासन स्तरावरून प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल. पुणे जिल्हयातील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकल्पाबाबतच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रकल्पनिहाय आढावा घेण्याच्या सूना देताना मंत्रालय स्तरावर यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रामुळे शेती तसेच शेतक-यांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.धरणातील पाणीसाठा स्थिती, शहरी तसेच ग्रामीण भागात घडू शकणा-या घटना, पेरणी स्थिती, कोरोना उपाययोजना यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच मान्सून तयारी व कोरोना विषयक उपाययोजनाबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. 
जलसंपदा विभागचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी धरणनिहाय पाणीसाठा तसेच प्रकल्पाबाबतची तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी  तालुकानिहाय खरिप पेरणी स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री कार्यालय,
मंत्रालय, मंबई,
दि. 2 जुलै 2020.

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला
पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश
- उपमुख्यमंत्री अजित पवार
                 
               मुंबई, दि. 2 :- सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, असा निर्णय आज विधान परिषद सभापतींच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत घेण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय ही सातारावासियांची गरज असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र इमारतीचे बांधकाम हे कलात्मक, दर्जेदार, पुढील शंभर वर्षांचा विचार करुन करण्यात यावे. तोपर्यंत, उपलब्ध आरोग्य यंत्रणेचा उपयोग करुन पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशांमुळे सातारवासियांची वैद्यकीय महाविद्यालयाची इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
                  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, विधान भवनातील त्यांच्या दालनात सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसंदर्भातील बैठक पार पडली. बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (व्हीसीद्वारे), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी  आदींसह सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (व्हीसीद्वारे) उपस्थित होते. 
           सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यासाठी 419 कोटी खर्चाचे, 100 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नाही. सातारा शहरवासियांची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, त्यानुसार विधान परिषद सभापतींच्या दालनात आज बैठक झाली. बैठकीत, शहरालगतची कृष्णनगर येथील जलसंपदा विभागाची 64 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा निर्णय झाला. बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्या (3 जुलै) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथं मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यास मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. 
               नवीन जागेवर उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि परिसर हा पुढील शंभर वर्षांचा विचार करुन विकसित करावा. सर्वं बांधकामे कलात्मक, दर्जैदार असावीत. गरज पडल्यास नामवंत तज्ञांचा सल्ला, मदत घ्यावी. इमारतीची कलात्मकता, उपयोगीता आणि दर्जात तडजोड करु नये. महाविद्यालयाबाहेरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, रेल्वेस्टेशन व एसटी स्टॅन्डकडून येणाऱ्या नागरिकांची सोय लक्षात घेऊन रस्त्यांची सुधारणा व्हावी, आदी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. 
                वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही सातारावासियांची सर्वात मोठी गरज असून यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, असा विश्वास देत असतानाच, जिल्ह्यातील उपलब्ध आरोग्य यंत्रणा उपयोगात आणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
*कोरोनाप्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचला*
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची तयारीही उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवली.
*****

*फोटोओळ :- सातारा येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील सभापतींच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (व्हीसीद्वारे), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी  आदींसह सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.*
*****