Saturday, February 18, 2017

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर - जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे, दि.18 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी आज येथे दिली.
            जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. राव यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. हा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावयाला हवा,यासाठी प्रशासन मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबवित आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, रांगोळी स्पर्धा आदींसह महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले आहेत. मतदारांनी निर्भीड आणि नि:पक्षपातीपणे कोणत्याही दबावाला बळी पडता मतदान करावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेच्या 13 तालुक्यातील 75 गटांसाठी 375 उमेदवार आणि पंचायत समितीच्या 150 गणांसाठी 641 उमेदवार येत्या 21 तारखेला आपले नशिब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेसाठी 27 लाख 92 हजार 773 मतदार आहेत. मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 364 असून 344 क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह 21 हजार 616 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रत्येक मतदान केंद्र निहाय एका पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून राखीव 1500 पोलीसांची नेमणूकही करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात 84 संवेदनशील मतदान केंद्रे असून या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आता पर्यंत मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण झाली असून मतदान यंत्र (ईव्हीएम) हाताळणीचे (हॅन्डस ऑन) प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 20 तारखेला तिसरे प्रशिक्षण होणार असून या प्रशिक्षणानंतर मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
            आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे 30 गुन्हे दाखल झाले असून मुंबई पोलीस कायद्यानवये 11 व्यक्तींना तडीपार करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144(3) नुसार 42 प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी या व्यक्तींना मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी योग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात 83 भरारी पथके, 64 व्हिडीओ सर्वेलन्स पथके तसेच 72 स्थीर सर्वेलन्स पथके नेमण्यात आली असून 53 हजार 308 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात 3 हजार 668 पैकी 3 हजार 386 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 346 गुन्ह्यांमध्ये 196 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 27 वाहनांसह सुमारे 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीत होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी दि.20,21 आणि 23 फेब्रुवारीला कोरडा दिवस (ड्रायडे) घोषीत करण्यात आला आहे.
            जिल्हा तालुका पातळीवर कायदा सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून तो 24 तास कार्यान्वित आहे. मतदान केंद्रामध्ये निवडणूक विषयक गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना अटकाव करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणुकी पुरते कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी दि.21 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दिवशी सर्व ताल्युक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
            नागरिकांनी कोणत्याही आमिषाला वा दबावाला बळी पडता पारदर्शीपणे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निश्चितपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असेही आवाहन पत्रकार परिषदेच्या शेवटी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नागरिकांना केले.

0000000

No comments:

Post a Comment