Saturday, May 20, 2017

पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी भोसले


सोलापूर दि. 19 :- पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना आज जिल्हाधिकारी                डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीस अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, जिल्हा उपनिबंधक नारायण आघावभारतीय रिझर्व्ह बँकेचे  व अन्य बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी गेल्या वर्षातील पीक कर्ज वाटप, विविध महामंडळाकडील योजनांचा आढावा घेतला. समाधानकारक कामगिरी नसलेल्या बँकांनी चांगली कामगिरी करावी असे आवाहन  त्यांनी केले. यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, सोलापूर जिल्हा कृषी आणि कृषीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीला कर्जपुरवठा झाल्याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती येणार नाही. त्यामुळे कर्ज मागणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा केला जाईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गेल्या वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयश आलेल्या बँकांनी यावर्षी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे, असे श्री. भोसले  यांनी सांगितले. पीक कर्ज वाटपाबरोबरच सामाजिक सुरक्षितता  योजनांची अंमलबजावणीही प्रभावी रित्या केली जावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्या योजनांचा कर्जपुरवठा करण्याबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

*****

No comments:

Post a Comment