Saturday, June 17, 2017

नवनवीन तंत्रज्ञान आत्‍मसात करुन येणा-या आव्‍हानांना सामोरे जा ‘सीएमई’च्‍या दीक्षांत समारंभात राष्‍ट्रपती मुखर्जी यांचे आवाहन






पुणे, दि. 16 – राष्‍ट्रीय- आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नवनवीन आव्‍हाने समोर येत आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहे. या सर्व आव्‍हानांना तुम्‍हाला सामोरे जायचे आहे. धैर्य, निष्‍ठा आणि समर्पित भावनेने आपण या  आव्‍हानांना  आत्‍मविश्‍वासाने सामोरे जाल,  असा विश्‍वास राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्‍यक्‍त केला.
 कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंगच्‍या (सीएमई) दीक्षांत समांरभात राष्‍ट्रपती मुखजी बोलत होते. यावेळी राज्‍यपाल सी. विद्यासागर  राव, सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज,  लेप्‍टनंट जनरल डी. आर. सोनी, सीएमइचे डेप्‍युटी कमांडंट व अधिष्‍ठाता  मेजर जनरल एच. के. अरोरा, पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. एम. जगदेश कुमार, डॉ. अनिल सहस्‍त्रबुध्‍दे आदी उपस्थित होते.
राष्‍ट्रपती श्री. मुखर्जी यांनी प्रारंभी पदवी आणि पदव्‍युत्‍तर पदवी संपादन करणा-या विद्यार्थ्‍यांना  शुभेच्‍छा दिल्‍या.  ते पुढे म्‍हणाले, दीक्षांत समारंभ हा कोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेच्‍या, शिक्षकांच्‍या,  विद्यार्थ्‍यांच्‍या, त्‍यांच्‍या पालकांच्‍या जीवनातील गौरवाचा  आणि  आनंदाचा क्षण असतो.
अभ्‍यासू वृत्‍ती, कष्‍ट आणि समर्पणाच्‍या भावनेने यश संपादन करणा-या सर्व विद्यार्थ्‍यांचे मनापासून अभिनंदन करुन ते पुढे म्‍हणाले, अभ्‍यासक्रम पूर्ण केल्‍यानंतर शिक्षण संपले असे नाही तर भविष्‍यातही नवनवीन ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रिया सुरु ठेवावी लागणार  आहे. सध्‍याच्‍या  युगात तंत्रज्ञान बदलत आहे.  नवनवीन संकल्‍पना पुढे येत आहेत. तरुण संशोधकांपुढे अद्ययावत ज्ञान संपादन करण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. सीएमईच्‍या विद्यार्थ्‍यांकडे  देश मोठ्या आशेने पहात आहे. चांगले अभियंते  आणि चांगले जवान अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत भारतीय लष्‍कराच्‍या कौशल्‍यवृध्‍दीत तुमचे योगदान राहील, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
सीएमई पुढील वर्षी आपल्‍या स्‍थापनेचा अमृतमहोत्‍सव  साजरा  करणार असल्याचा उल्‍लेख करुन राष्‍ट्रपती  श्री. मुखर्जी म्‍हणाले, राष्‍ट्रीय आणि आंतर्राष्‍ट्रीय स्‍तरावर संरक्षणविषयक वातावरण बदलत आहे. माहिती-तंत्रज्ञान,  सायबर गुन्‍हेगारी यामुळे लष्‍करी आणि डावपेचात्‍मक कौशल्‍यांचा वापर करावा लागणार आहे. परांपरागत आणि अद्ययावत ज्ञानाचा योग्‍य समन्‍वय राखून लष्‍करी सामर्थ्‍य वाढीसाठी आपणांस प्रयत्‍न करावा लागणार आहे.
सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज यांनी स्‍वागतपर भाषण केले.   लेप्‍टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी प्रास्‍ताविक केले. ते म्‍हणाले, देशात एकूण 32 लष्‍करी प्रशिक्षण संस्‍था असून सीएमई त्‍यापैकी एक आहे. भारतीय लष्‍कर कोणत्‍याही आव्‍हानांना सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज असल्‍याचे  स्‍पष्‍ट करत त्‍यांनी  सैन्‍य दलाचा दर्जा उत्‍तम राहण्‍यासाठी नियमित प्रशिक्षण दिले जात असल्‍याचे सांगितले.
सीएमइचे डेप्‍युटी कमांडंट व अधिष्‍ठाता  मेजर जनरल एच. के. अरोरा यांनी सीएमईच्‍या  अधिका-यांच्‍या ज्ञानाचा देशाच्‍या लष्‍कराला आणि लोकशाहीच्‍या संवर्धनासाठी लाभ होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली. 
 जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. एम. जगदीश  कुमार यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. सीएमइच्‍या गौरवशाली परंपरेचे जतन करुन तो वारसा पुढे चालविण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
 कार्यक्रमात विविध विषयात गुणवत्‍ता प्राप्‍त करणा-या अधिका-यांचा राष्‍ट्रपती मुखर्जी यांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये लेप्‍टनंट कर्नल रोहित ओबेरॉय, लेप्‍टनंट कर्नल मनोज सिंग, कॅप्‍टन आदित्य सिंग, कॅप्‍टन सदानंद सिन्‍हा, कॅप्‍टन विजयकुमार यादव, लेप्‍टनंट सौरभ पराशर, लेप्‍टनंट मनीष कुमार यांचा समावेश होता.
 सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज यांनी आभार मानले. दीक्षांत समारंभास लष्‍करी अधिकारी, विद्यार्थी आणि त्‍यांचे पालक उपस्थित होते.
****


No comments:

Post a Comment