Thursday, June 29, 2017

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूजला उत्स्फुर्त स्वागत


पंढरपूर दि. 29 :-  जावू देवाचिया गावा...देव देईल विसावा पंक्तीनुसार श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर झाले. लाखो वारकरी भाविकांनी हा रिंगण सोहळा नेत्रात साठवून घेतला.
            नीरा नदी ओलांडून जिल्ह्यात दाखल झालेल्या संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. पालकमंत्री देशमुख यांनी अश्व पूजन  केले. तद्नंतर  जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे मनोभावे पूजन करुन दर्शन घेतले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हणमंतराव डोळस, माळशिरच्या सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू  उपस्थित होते.
            पालखी स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले ही  होते.
            अकलूज गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
रिंगण सोहळ्यास गर्दी
            जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला.  अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण अकलूजकर आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी नेत्रदीपक असा होता.






*****

No comments:

Post a Comment