Tuesday, June 27, 2017

माळीण पुनर्वसन कामाचा अहवाल येत्या दहा दिवसात सादर होणार-जिल्हाधिकारी सौरभ राव


*जिल्हाधिकारी राव यांच्याकडून माळीणची पाहणी
*ग्रामस्थांनी घाबरुन जावू नये, असे जिल्हाधिकारी यांचे आवाहन




        पुणे, दि. 27: माळीण पुनर्वसन कामाची पाहणी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमण्यात आली असून ही समिती या कामांतील त्रुटींबाबतचा अहवाल येत्या दहा दिवसात जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे काम जलद गतीने सुरु असून घरांच्या बांधकामांना धोका नसल्यामुळे माळीणच्या गावकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहनही श्री.राव यांनी केले आहे.
                                                                
            पुनर्वसित माळीणमध्ये झालेल्या पहिल्या मोठ्या पावसानंतर माती खचल्यामुळे बांधकामाला तडे गेले तसेच पायऱ्या खचल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. राव यांनी आज  माळीणला भेट देऊन विविध कामांची  पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एम.व्ही.पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रो.बी.जी.बिराजदार, स्ट्रक्चर इंजिनिअर मोहन साखळकर, तहसिलदार रवींद्र सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           
 यावेळी श्री.राव म्हणाले, माळीण गावच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.  पहिल्या पावसानंतर खचलेले रस्ते, पायऱ्या आदि कामे तात्काळ पूर्ण करुन घेण्यासाठी मॉनेटरिंगची टिम नेमण्यात येत असून यात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभागाचे उपअभियंता, तसेच माळीण मधील पाच ग्रामस्थांचा या समितीमध्ये सहभाग असेल. समिती  आवश्यक कामे दाखवून देईल. त्याप्रमाणे कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्या ठिकाणी गटारे बांधणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी येत्या दोन दिवसात अधिकारी नियुक्त करण्यात येतील ते अधिकारी येत्या दोन दिवसात माळीणमध्ये थांबून तांत्रिकदृष्टया अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करतील. त्याप्रमाणे या अहवालानुसार डोंगर गटारी बांधण्यात येतील. जेणेकरुन पावसाचे पाणी अडल्यामुळे रस्ता व पायऱ्या खचणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
            अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी तसेच या भागात मोठया प्रमाणावर होणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता आवश्यक कामे करण्यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
            गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीची तसेच पाईपलाईनची पाहणी करुन नादुरुस्त असल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. गळती असणाऱ्या घरांच्या  छतांचीही  तात्काळ दुरुस्ती करावी,अशा सूचना श्री राव यांनी केल्या.
            जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे माळीणमध्ये जमीन खचली जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने  पावसाचे प्रमाण आणि डोंगरावरुन वाहणाऱ्या पाण्याची दिशा आणि पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करुन उपाययोजना  कराव्यात.
            निवृत्त सचिव श्री. पाटील म्हणाले, पुनर्वसीत माळीणच्या कामाच्या त्रुटींबाबत अभ्यास करुन लवकरच अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल. त्रुटी असणारी कामे, त्रुटींचे कारण आणि त्यावर उपाययोजना अशा तीन टप्प्यात अहवाल सादर करण्यात येईल. डोंगरावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होईल हे पहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील.
            प्रास्ताविक श्री.सबनीस यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राव यांनी ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तात्काळ कामे पूर्ण करुन घेण्यात येतील,असे अश्वासनत्यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच विद्युत पुरवठा, रस्ते व बांधकाम दुरुस्ती तात्काळ करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करुन द्यावा, अशा सूचना संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

0000

No comments:

Post a Comment