Tuesday, August 1, 2017

पूना कॉलेजमध्ये यापुढे आठवड्यातून एकदिवस “ऊर्दू लोकराज्य”चा विशेष तास - प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख



पूना कॉलेजमध्ये यापुढे आठवड्यातून
एकदिवस ऊर्दू लोकराज्यचा विशेष तास
-    प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख
पुणे दि.1: शासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात येणारे लोकराज्य मासिक हे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्यच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात मोठा बदल होणार आहे, त्यामुळे यापुढे पूना कॉलेजमध्ये प्रत्येक आठवड्यातून एक दिवस लोकराज्यचा विशेष तास घेणार असल्याचे प्रतिपादन पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय माहिती कार्यालय, पुणे, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि वाय ॲण्ड एम अंजूमन खैरुल इस्लाम संस्थेच्या पुना कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्दू लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेख बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मोईनुद्दीन खान, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य इब्राहिम खन, पर्यवेक्षक मेहराजवुल हक उपस्थित होते.
            प्राचार्य डॉ. शेख म्हणाले, लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. या मासिकाच्या नियमित वाचनाने शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची माहिती मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते. ऊर्दू लोकराज्य हे ऊर्दू भाषिकांसाठी उपयुक्त आहे. मातृभाषेत मिळणारी माहिती अधिक चटकन समजते त्यामुळे ऊर्दू लोकराज्य हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी या लोकराज्यचा लाभ घेवून ते तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.
            श्री. मोहन राठोड म्हणाले, ऊर्दू भाषेत गोडवा आहे. या भाषेच्या अभ्यासामुळे वक्तृत्व बहरते. त्यामुळे ऊर्दू भाषेचे महत्व वेगळे आहे. सर्व भाषांचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे त्यामुळे ऊर्दू भाषेला चालना देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी शासन विविध उपाययोजना अवलंबत असते. ऊर्दू लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.   
            मोईनुद्दीन खान म्हणाले, ऊर्दू भाषेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. ऊर्दूच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना शासन राबवत असते, ही ऊर्दू भाषेसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऊर्दू लोकराज्य हे अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला गती मिळेल. या ऊर्दू लोकराज्य वाचक चळवळीला गती देण्यासाठी पूना कॉलेज सक्रीय मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहाय्यक जयंत करपे यांनी केले. अभार राजेंद्र सरग यांनी मानले. या कार्यक्रमाला माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक संग्राम इंगळे, विलास कसबे, विशाल कार्लेकर, रोहीत साबळे, संजय गायकवाड, सुर्यकांत कासार, ए. एम. खान, रावजी बांबळे, पूना महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊर्दू लोकराज्यचे 1 हजार वर्गणीदार करणार
पूना कॉलेजमध्ये गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येते. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्दू लोकराज्य अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ऊर्दू लोकराज्यचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी येत्या आठ दिवसात कॉलेजमध्ये लोकराज्य वर्गणीदारांची विशेष मोहीम राबवून 1 हजार ऊर्दू लोकराज्य वर्गणीदार करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य आफताब अन्वर शेख यांनी यावेळी बोलताना दिली. 

*****

                  

No comments:

Post a Comment