Saturday, August 12, 2017

विश्व शांती विद्यापीठातून मूल्याधारीत शिक्षण घेतलेली नवी पिढीच जग बदलेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. १२: अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहेहा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण प्राप्त केलेली नवी पिढीच जग बदलेलअसा विश्वास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोथरुड येथील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमआयटीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड, स्विडनचे ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक मायकल नोबेल, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा ‍विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण विजय भाटकर, युजीसीचे माजी चेअरमन डॉ. अरुण निगवेकर, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन सिस्टिमचे चेअरमन नानीक रुपानी, अध्यात्मिक गुरु जे.पी. ऊर्फ दादा वासवानी, प्रसिध्द तबलावादक पंडीत सुरेश तळवळकर उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षण हे मूल्यांवर आधारित असावे. मूल्यरहित शिक्षण ही फक्त माहिती असते ते ज्ञान नसते. जीवन जगताना कोणत्याही विषयाचे केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते तर त्याला मूल्य शिक्षणाची जोड आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाचे स्वप्न बघून ते पूर्ण करणाऱ्या कराड कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण दिले जाईल. शासनाच्यावतीने अशा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल.
अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहे. मूल्याधारित शिक्षणच हा अंध:कार दूर करेल. यामाध्यमातून जगात बंधूत्वाची भावना निर्माण होईल. यामुळे जग अधिक सुंदर होईल, ते सर्वांना जगण्यास लायक होईल. विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. यापुढेही एमआयटी हे नवीन प्रयोग करण्यात आघाडीवर राहील असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जीवन जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आवश्यक आहे. मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडतील.
डॉ. विजय भटकर म्हणाले, या विश्व शांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. अशा प्रकारच्या विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती व्हावी असे माझे स्वप्न होते. डॉ. कराड यांनी ते पूर्ण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन उंचावेल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माची जोडच जगाला शांततेचा रस्ता दाखवेल. स्वामी विवेकानंदाच्या विचारावर ही संस्था सुरु आहे. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळेल.
यावेळी दादा वासवानी, मायकेल नोबेल, डॉ. जय गोरे यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्व शांती विद्यापीठाचे उद्घान करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दादा वासवानी यांच्यावरील माहिती पट यावेळी दाखवण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना विश्व शांती विद्यापीठाची शपथ श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल कराड यांनी केले. तर आभार मंगेश कराड यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच एमआयटी विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment