Friday, June 22, 2018

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र देशासाठी रोल मॉडेल – उपराष्ट्रपती नायडू


बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र
देशासाठी रोल मॉडेल उपराष्ट्रपती नायडू
बारामती दि.22 : -  कृषी,विज्ञान,शिक्षण क्षेत्रात बारामतीने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. येथील  कृषी विज्ञान केंद्र हे देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
बारामती मधील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर शैक्षणिक संकुल आणि विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदींची उपस्थिती होती.
                        बारामती येथील कृषी तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रात झालेली प्रगती सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखी आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेले संशोधनही इतर अभ्यासकांना उपयुक्त आहे, असे सांगून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, कृषी विस्तार क्षेत्रात सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी काम करण्याची गरज आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही संशोधनात मुलभूत काम केले आहे. ते शेतक-यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राची असल्याचे त्यांनी नमूद केले.
                          देशातील शेतक-यांपुढे  आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर आहेत. मात्र त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी येथे संशोधन क्षेत्रात होत असलेले काम मूलभूत स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
                          उपराष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर आपण केवळ एकाच ठिकाणी थांबता देशातील चांगल्या संशोधन संस्था, कृषी संस्था, विद्यापीठे यांना आवर्जून भेट देत आहे. तेथील संशोधन, नवीन प्रकल्पांची माहिती घेत असलयाचे श्री.नायडू यांनी नमूद केले.
                           दरम्यान पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी श्री.नायडू यांनी विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी श्री.पवार यांना विविध ठिकाणांहून भेट मिळालेल्या वस्तू, त्यांची छायाचित्रे यांची श्री. नायडू यांनी पाहणी केली. पाहणीवेळी नायडू हे भारावून गेले होते.
                        "हे संग्रहालय एक असामान्य व्यकतीमत्वाचं व्यक्तीचित्रण करणारे प्रतिबिंब आहे. अतिशय मौल्यवान असा हा ठेवा असून अतिशय उत्कृष्ट पध्दतीने तो जतन करण्यात आला आहे. नवीन युवा पिढीस हा ठेवा निश्चित मार्गदर्शक ठरेल", असा अभिप्राय यावेळी श्री.नायडू यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंदवला.
                       यावेळी त्यांनी श्री.पवार, श्रीमती सुळे, पालकमंत्री बापट,श्री.अजित पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष .व्ही.प्रभुणे, रजिस्ट्रार कुंभाजकर यांच्यासह या संग्रहालयाची पाहणी केली.
                     विभागीय आयुक्त डॅा.दिपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक आदींची उपस्थिती होती.
0 0 0 0



No comments:

Post a Comment