Saturday, June 30, 2018

आत्मबळ, जिद्द व चिकाटीमुळे यश प्राप्त होते -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले


            पुणे दि. 30 : अपयशामागे यश लपलेले असते, हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आत्मबळ, जिद्द व चिकीटीमुळे यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग-नागरी परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा परीक्षा 2017 मधील बार्टीपुरस्कृत तसेच अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यशदा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. अनुसूचित आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यावेळी उपस्थित होते.
            यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री.बडोले म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या सेवेकाळात शासन व प्रशासनात ताळमेळ ठेवून समाजाच्या विकासासाठी काम करावे. बार्टीतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्णाचे प्रमाण वाढावे, यासाठी बार्टीतर्फे दोनशे विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील नामांकित खाजगी कोचींग क्लासेसला प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
            अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल यांनी, बार्टीच्या उपक्रमांचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रातही यश संपादन करावे असे सांगितले.
            सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात बार्टीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसह बार्टीपुरस्कृत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाची माहिती दिली.
            यशस्वी विद्यार्थ्यांपैकी नागरी सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ.गिरीश बडोले यांनी मनोगत व्यक्त्‍ केले. अपयशातून खचून न जाता, नेटाने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी सांगितले.
            नागरी सेवा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दर्शविणाऱ्या 'यशोगाथा' या पुस्तिकेचे विमोचन सामाजिक न्याय मंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांच्याहस्ते, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक न्याय विभाग व बार्टीचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000





No comments:

Post a Comment