Tuesday, August 13, 2019

मदत व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणार - विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर


प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

पुणे दिनांक 13 : कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणक्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा असला तरी पर्जन्यमान सामान्य आहे. या आपत्तीत आत्तापर्यंत 48 जण मृत्युमुखी पडले असून पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचे व सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
 आता पूर ओसरलेला आहे, आमच्यापुढे आव्हान आहे, ते मदत व पुनर्वसनाचे! या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सार्वजनिक बांधकाम, कृषि विभाग, विद्युत विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  दिनांक 13 मे 2015 च्या शासन निर्णयात आपत्ती प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक विभागाने काम करावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम करावे, असे सांगितले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, सध्या पूरपरिस्थिती  निवळत आहे. सध्या सांगली येथे नदी पातळी धोका पातळीच्या केवळ 4 इंचावरुन वाहत आहे तर कोल्हापूरमध्ये धोका पातळीच्या 1 फूट 11  इंचावरून वाहत आहे.  मात्र सध्या धरणक्षेत्रात पाऊस सामान्य असल्याने ही पूर पातळी झपाट्याने उतरणार आहे.
धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक 25 हजार 287 क्युसेक असून 27 हजार 265 क्येसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे. कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक असून धरणात 6 लाख 11 हजार 970 क्युसेक इतकी आवक आहे .दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पुढच्या काही तासात सामान्य होईल.
 या पूरस्थितीत पुणे विभागात एकूण 48 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21, कोल्हापूर जिल्ह्यात 10, सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 7 तर सोलापूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 हजार 448 घरांची अंशत: पडझड झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 236 घरांची अंशतः 268 घरांची पूर्णतः तर 313 गोठ्यांची पडझड झाली आहे.
 कोल्हापूर मधील काही भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयात जमा झालेली मदत पूरग्रस्त भागांना पाठवण्यात आली आहे.  यामध्ये 24 ट्रक कोल्हापूरला, 19 ट्रक सांगली जिल्ह्याला पाठवण्यात आली आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जमा झालेली 6 लाख 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे जमा करण्यात आली आहे
बाधित क्षेत्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 732 वीज ग्राहकांची तर सांगली जिल्ह्यातील 48 हजार 255 वीजग्राहकांच्या खंडित वीज पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणाची विविध पथके वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यातील बँकिंग सेवा ही पूर्ववत होत आहेत, सर्व बँकेत व एटीएममध्ये  आवश्यक असणाऱ्या रकमेचा भरणा करण्यात आला आहे.  त्याचबरोबर बाधित क्षेत्रातील बंद रस्ते व पुलांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात मोठ्या प्रमाणात यश येत आहे तसेच एसटीची सांगली जिल्ह्यातील 22 मार्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील 20 मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
 सध्या पूरस्थिती सामान्य होत असून शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान व पाच हजार रोख रक्कम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात सुरुवात केली आहे, उर्वरित ठिकाणी ही रक्कम देण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून 302 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. पूर ओसरताच बाधीत क्षेत्रातील शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मृत जनावरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत असून जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले
000000



  

No comments:

Post a Comment