Friday, June 10, 2022

केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा गौरव · राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

 

 

 

            मुंबईदि. 10 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये सातारा जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचेकौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात सातारा जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेलअसा विश्वासही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

            उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोविड काळात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील जवळपास एक हजार  कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. कोविडमुळे विधवा झालेल्या भगिनी आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या या कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.  सातारा जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणार आहेअसे राज्यमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या वाशिमसिंधुदुर्गठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

                दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून निवडल्या गेलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

००००







 #खरीप हंगामासंदर्भात #कृषी विभागाच्या नियोजनासंबंधी माहिती देणारी कृषीमंत्री @dadajibhuse  यांची मुलाखत #दिलखुलास कार्यक्रमात दि. ११ व १३ जून रोजी स. ७.२५ वाजता तर @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात १६ जूनला सायं. ७.३० वाजता प्रसारित होईल.

Friday, June 3, 2022

‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल-राज्यमंत्री कु.आदिती तटकरे तळेगाव दाभाडे येथे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाचे अनावरण

 




पुणे दि.३- मुली आणि महिलांच्या प्रगतीशील वाटचालीचे उद्दीष्ट समोर ठेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात आलेले ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्प प्रेरणादायी ठरेल. या शिल्पाची प्रतिकृती आपल्याही भागात उभारू, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात आलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शिल्पाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके, बबन भेगडे, गणेश खांडगे, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, एखाद्या भागातील चांगल्या विकासकामांचे अनुसरण इतर भागातही होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामांची माहिती घेतल्यास आपल्या भागात चांगली कामे करता येतील. मावळ परिसरात वेगाने विकासकामे होत आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकप्रतिनीधी म्हणून आपण केलेल्या कामावर पुढे संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्याने जनतेचे काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मिळाल्यानंतर आपल्या कामावर यश अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या.
आमदार शेळके म्हणाले, स्त्री भृणहत्या थांबली पाहिजे, मुलींना शिक्षण मिळायला हवे आणि त्यांना स्वावलंबी करायला हवे. समाजामध्ये ही बाब रुजविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते तळवडे येथील उद्यानाचे उद्घाटन

 


पुणे दि.३- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे आदी उपस्थित होते.
तळवडे उद्यान अंदाजे १ एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम शाळा, लॅन्डस्केपिंग, फलोत्पादनविषयक कामे करणेत आले आहेत.
*इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन*
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी भक्ती-शक्ती चौकातील इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन केले. ६ ते ८ मीटर रुंदी असलेले मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले असून वृक्षारोपण व लॉन तयार करण्यात आले आहे. सोबत खुली व्यायामशाळा व मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन

 

पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सखुबाई गबाजी गवळी उद्यानासमोरील अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वाहनतळामुळे भोसरी येथून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतील असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर तळमजला अधिक ३ मजले असे पार्किंग करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ चारचाकी तर १५० दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था आहे. वरील मजल्यांवरून ये-जा करण्याच्या दृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकचे नियोजन करण्यात आले आहे.
चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट व पाहणी
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे मनपा हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या (२००८ ते २०१० या कालावधीतील) गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर येणारा भार कमी होऊन शहरातील सर्व भागांना पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
See insights
Boost a Post
4

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन

 


पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
*औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष*
शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
महानगरपालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
*उद्योग सुविधा कक्ष वैशिष्ट्ये*
शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल*
*अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण*
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात २०+२० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.
*ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण*
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे
*पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता ५० स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण*
शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.
-------

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

 


पुणे दि.३-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.
भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.