Friday, August 7, 2020

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार






             पुणे,दि.७: 'कोरोना' विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय 'कोरोना' संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

          पुणे शहरातील 'कोरोना'च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन झिरो पुणे' या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.

         उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये 'कोरोना'च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. या 'कोरोना'च्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करुन या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

     भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व  मालेगाव येथे 'मिशन झिरो' मोहिम राबबिण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे 3 ते 5 हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

***

बाल्मिकी समाज संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

 

पुणे, दिनांक 7 :- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 साठी देण्यात आली आहे.

          यावेळी  नगरसेविका गीता मंचरकर, बाल्मिकी समाज संस्थेचे संस्थापक राजेश बडगुजर, प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारे, ॲड. सुशील मंचरकर आदि उपस्थित होते.        

Thursday, August 6, 2020

नागरिकांनी नियमांचे पालन करत सहकार्य करण्याचे आवाहन- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे



गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

        पंढरपूर दि.6- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर रुग्णांना तत्परतेने उपचार उपलब्ध होण्यासाठी आणि कोरोनाचा  प्रसार थांबवण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीरीत्या राबवीत असून,  नागरिकांनी संचार बंदीच्या कालावधीत  नियंमांचे पालन करीत सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले आहे.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे झुआरी सिमेंट कंपनीच्या वतीने आज गरीब व गरजूंना  जीवनावश्यक वस्तूच्या किटचे  वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , पोलिस निरिक्षक अरुण पवार, झुआरी सिंमेंट  कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक हर्षल तरटे,  अजित पवार, अगस्ती देठे, मोहक गांधी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे म्हणाले,  मागील काही दिवसांपासूण जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात  आणण्यासाठी 7  ते 13 ऑगस्ट 2020 या कालावधीत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन मध्ये नागरीकांना संचार  करण्यासास बंदी असणार आहे. लॉकडाऊन मुळे अनेक नागरिकांना रोजगार  मिळणार नसल्यामुळे झुआरी सिमेंट कंपनीच्या माध्यमातून शहरातील 300  गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे  वाटप करण्यात आले. शहरातील संतपेठ, व्यासनारायण झेपडपट्टी, ज्ञानेश्वर नगर, कडबे गल्ली, सुलेमान चाळ आदी भागात किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. कवडे यांनी सांगितले..
            ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास आदी कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा. नियमांचे काटेकोर पालन करीत  लॉकडाऊन कडक पाळून करोनाची साखळी तोडण्यास  नागरिकांनी प्रशासनाच सहकार्य करावे असे आवाहनही डॉ.कवडे यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी  आजाराची लक्षणे असणाऱ्या व करोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत-जास्त  नागरिकांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करुन घ्याव्यात असे आवाहन  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले. यावेळी झुआरी सिंमेंट  कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक हर्षल तरटे यांनी तालुक्या गरीब व गरजू नागरिकांना 1 हजार 800 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
 

फळपिक विमा योजनेत महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश - विजयकुमार राऊत


सातारा दि. 6 (जि. मा. का) : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नसल्याने तो करण्याविषयी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेशपिक विमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात  आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.

 तसेच महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व महाबळेश्वर महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पिक विमा योजनेमध्ये होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. याचाही पाठपुरावा कृषी विभागाने केल्याने चालू खरीप हंगामापासून महाबळेश्वर व पाचगणी महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पिक विमा योजनेमध्ये करण्यात आला आहे.

फळपिक विमा योजनेमध्ये जिल्हयातील ४ हजार ९०२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविले असून २ हजार ४२२ हे. क्षेत्र संरक्षित केले आहे. तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेत जिल्हयातील २६ हजार ४०६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून सुमारे १० हजार हे. क्षेत्र संरक्षित केले आहे, अशीही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी दिली आहे.

0000

पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 1 लाख 23 हजार 967 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


     पुणे दि. 6:- पुणे विभागातील  81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 97  हजार 309 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित  68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 303 आहे.  पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2  हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 ,  सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत  4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 252  आहे. कोरोनाबाधित एकूण 146  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 9 हजार 822 कोरोना बाधीत रुग्ण असून 6  हजार  13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 281 आहे. कोरोना बाधित एकूण 528  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 545 आहे. कोरोना बाधित एकूण 108  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 420  कोरोना बाधीत रुग्ण असून 3  हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 580 आहे. कोरोना बाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  6 लाख 41  हजार 88  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  1  लाख  23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

( टिप :- दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन - विभागीय आयुक्त सौरभ राव



  पुणे दि.6: - वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 10 मे 2020 ते 31 जुलै 2020 अखेर परदेशातून चौथ्या टप्प्या अखेर 6 हजार 313 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. पाचव्या  टप्प्यामध्ये 1  ऑगस्ट 2020 ते आज अखेर 304 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 377 सातारा जिल्हयातील 349,  सांगली जिल्हयातील 259, सोलापूर जिल्हयातील 301  तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्   सौरभ राव  यांनी दिली.
 
0 0 0  0

संचारबंदीमध्ये पंढरपुरात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन


                सोलापूर, दि.6: पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

          तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागरिकांच्या हितासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा आणि दूध वितरण सुरू राहणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे. टाळाटाळ करू नका, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले आहे.

          मास्कचा वापर करा. सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने स्वच्छ धुवा. कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तत्काळ दवाखान्याशी संपर्क करून उपचार करून घ्या. जा.  कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा. घाबरू नका...पण जागरूक रहा, या काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.

00000