Thursday, June 29, 2017

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूजला उत्स्फुर्त स्वागत


पंढरपूर दि. 29 :-  जावू देवाचिया गावा...देव देईल विसावा पंक्तीनुसार श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर झाले. लाखो वारकरी भाविकांनी हा रिंगण सोहळा नेत्रात साठवून घेतला.
            नीरा नदी ओलांडून जिल्ह्यात दाखल झालेल्या संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. पालकमंत्री देशमुख यांनी अश्व पूजन  केले. तद्नंतर  जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे मनोभावे पूजन करुन दर्शन घेतले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हणमंतराव डोळस, माळशिरच्या सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू  उपस्थित होते.
            पालखी स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले ही  होते.
            अकलूज गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
रिंगण सोहळ्यास गर्दी
            जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला.  अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण अकलूजकर आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी नेत्रदीपक असा होता.






*****

Tuesday, June 27, 2017

माळीण पुनर्वसन कामाचा अहवाल येत्या दहा दिवसात सादर होणार-जिल्हाधिकारी सौरभ राव


*जिल्हाधिकारी राव यांच्याकडून माळीणची पाहणी
*ग्रामस्थांनी घाबरुन जावू नये, असे जिल्हाधिकारी यांचे आवाहन




        पुणे, दि. 27: माळीण पुनर्वसन कामाची पाहणी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमण्यात आली असून ही समिती या कामांतील त्रुटींबाबतचा अहवाल येत्या दहा दिवसात जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे काम जलद गतीने सुरु असून घरांच्या बांधकामांना धोका नसल्यामुळे माळीणच्या गावकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहनही श्री.राव यांनी केले आहे.
                                                                
            पुनर्वसित माळीणमध्ये झालेल्या पहिल्या मोठ्या पावसानंतर माती खचल्यामुळे बांधकामाला तडे गेले तसेच पायऱ्या खचल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. राव यांनी आज  माळीणला भेट देऊन विविध कामांची  पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एम.व्ही.पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रो.बी.जी.बिराजदार, स्ट्रक्चर इंजिनिअर मोहन साखळकर, तहसिलदार रवींद्र सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           
 यावेळी श्री.राव म्हणाले, माळीण गावच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.  पहिल्या पावसानंतर खचलेले रस्ते, पायऱ्या आदि कामे तात्काळ पूर्ण करुन घेण्यासाठी मॉनेटरिंगची टिम नेमण्यात येत असून यात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभागाचे उपअभियंता, तसेच माळीण मधील पाच ग्रामस्थांचा या समितीमध्ये सहभाग असेल. समिती  आवश्यक कामे दाखवून देईल. त्याप्रमाणे कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्या ठिकाणी गटारे बांधणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी येत्या दोन दिवसात अधिकारी नियुक्त करण्यात येतील ते अधिकारी येत्या दोन दिवसात माळीणमध्ये थांबून तांत्रिकदृष्टया अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करतील. त्याप्रमाणे या अहवालानुसार डोंगर गटारी बांधण्यात येतील. जेणेकरुन पावसाचे पाणी अडल्यामुळे रस्ता व पायऱ्या खचणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
            अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी तसेच या भागात मोठया प्रमाणावर होणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता आवश्यक कामे करण्यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
            गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीची तसेच पाईपलाईनची पाहणी करुन नादुरुस्त असल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. गळती असणाऱ्या घरांच्या  छतांचीही  तात्काळ दुरुस्ती करावी,अशा सूचना श्री राव यांनी केल्या.
            जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे माळीणमध्ये जमीन खचली जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने  पावसाचे प्रमाण आणि डोंगरावरुन वाहणाऱ्या पाण्याची दिशा आणि पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करुन उपाययोजना  कराव्यात.
            निवृत्त सचिव श्री. पाटील म्हणाले, पुनर्वसीत माळीणच्या कामाच्या त्रुटींबाबत अभ्यास करुन लवकरच अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल. त्रुटी असणारी कामे, त्रुटींचे कारण आणि त्यावर उपाययोजना अशा तीन टप्प्यात अहवाल सादर करण्यात येईल. डोंगरावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होईल हे पहाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील.
            प्रास्ताविक श्री.सबनीस यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राव यांनी ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तात्काळ कामे पूर्ण करुन घेण्यात येतील,असे अश्वासनत्यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच विद्युत पुरवठा, रस्ते व बांधकाम दुरुस्ती तात्काळ करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करुन द्यावा, अशा सूचना संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

0000

Tuesday, June 20, 2017

पंढरपूर शहरात दुचाकीवरील आरोग्यदूत सहाय्य करणार

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा
आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 20 : पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी व भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज आढावा घेतला. आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील रुग्णवाहिकेच्या सेवा, आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, पालखी मार्गावरील जलस्त्रोतांचे शुध्दीकरण याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. वारी काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय्य करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. बी.डी. पवार आदी यावेळी उपस्थित होते.
दिनांक 30 जून ते 9 जुलै या दहा दिवसांच्या काळात पंढरपूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रिस्तरीय पध्दतीने आरोग्य सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरात येथे अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे 100 खाटांचे आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर 50 खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 18 धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून पंढरपूर येथे वारी काळात 24 तास आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
वारी काळात संपूर्ण पालखी मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील (क्रमांक 108) 75 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दोन मुख्य पालखींसोबत 108 व 102 क्रमांक सेवेतील 12 रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आल्या आहेत.
वारी काळामध्ये पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविकांना आरोग्य सुविधेबाबत सहाय्य करतील. हे आरोग्यदूत शहरातील पाणी शुध्दीकरण तपासणीबरोबरच आरोग्य केंद्रांची माहिती देखील नागरिकांना देतील. त्याचबरोबर रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी आहे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच गरज भासल्यास दुचाकीवरुन रुग्णाला जवळच्या दवाखान्यात देखील उपचारासाठी नेण्यात येईल. फक्त पंढरपूर शहरातच 102 व 104 क्रमांक सेवेतील 14 रुग्णवाहिका ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका प्रसंगी बाह्य उपचार केंद्र म्हणून देखील या काळात कार्यरत राहतील. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संपर्क कक्ष (02186-225101/225103) सुरु करण्यात येणार आहे. याबरोबरच शहरात आठ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
वारीच्या काळात 108 क्रमांकाच्या सेवेतील आपत्कालीन रुग्णवाहिकेचे नियंत्रण कक्ष पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलला स्थानिक ठिकाणांवर अचूक पध्दतीने रुग्णवाहिका पाठविणे सुलभ होणार आहे. पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी मार्गावरील आरोग्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी त्यांचे बळकटीकरण करण्यात आले आहे.
पालखी मार्गावरील सर्व जलस्त्रोतांची तपासणी करुन त्याचे क्लोरीनेशन करण्यात आले आहे. टँकरमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला असते त्याच्या दोन दिवस आधी त्या भागात डास प्रतिबंधक फवारणी केली जाते. वारी काळात भाविकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ. संजय देशमुख, सोलापूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००

अजय जाधव/विसंअ/20/6/17

Monday, June 19, 2017

केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय पुरस्कार


 नवी दिल्ली, 19 : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
                  येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वतीने वार्षीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मंत्रालयाअंतर्गंत देशभर राबविण्यात येणा-या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या राज्यांच्या विविध संस्थांना यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा यावेळी उपस्थित होते.  विविध श्रेणींमध्ये  यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही.आर.नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

                                    प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) राज्याला 5 पुरस्कार
                               अंमलबजावणीत सातारा जिल्हा ठरला अव्वल
                    प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत(ग्रामीण) लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी,  उपग्रहाद्वारे निरिक्षण (जिओ टॅगींग) आणि घरकुलांना मंजुरी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला असून आज सुवर्ण पदकाने राज्याचा गौरव करण्यात आला.  राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता आणि ग्रामीण गृह निर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून सातारा जिल्हयाची निवड करण्यात आली असून सातारा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
                  या योजनेची सर्वचक्षेत्रात  प्रभावी अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम स्थानावर राहीले आहे. या उपलब्धीसाठी सातारा जिल्हयाला सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले. सातारा जिल्हयातील कराडचे गट विकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधीचे वितरण करणे व घरकुलांना मंजुरी देण्यात उत्तम कार्य केल्याबद्दल राज्याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण विभागाच्या उपसंचालक विना सुपेकर  यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या योजनेअंतर्गत गवंडी प्रशिक्षण देण्यात देशात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असून यावेळी कांस्य पदकाने राज्याला सन्मानीत करण्यात आले. ग्रामीण गृह निर्माण विभागाचे मुख्य अभियंता एस.आर.मालपानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
                                       हरित तंत्रज्ञाच्या प्रयोगासाठी राज्याचा सन्मान
                  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गंत राज्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी  महाराष्ट्राला  तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही.आर.नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
                                                मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हयाचा सन्मान
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा)प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातून गोंदिया जिल्हयाला सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी रविंद्र ठाकरे आणि माजी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  
                                                          मनरेगा विशेष गणकात अमरावतीचा सन्मान
मनरेगाच्या अमंलबजावणीत तांत्रिक दृष्टया प्रभावीपणे कार्य करण्यासाठी  राज्यातून अमरावती जिल्हयाचा सन्मान करण्यात आला. अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तांत्रिक अधिकारी निकेश निंबाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चिखलीसह देशातील तीन ग्रामपंचायतींना यावेळी सन्मानीत करण्यात आले.                                  
                                                            तंत्रज्ञान विभागातील पुरस्कारावरही महाराष्ट्राची मोहर       
            केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून योगदान देणा-या विविध राज्यांतील संस्थांचा यावेळी विविध श्रेणींमध्ये सत्कार करण्यात आला. तंत्रज्ञान विभागातील प्रेरणादायी पुरस्कारासाठी नवी मुंबईतील रामराव आदिक तंत्रज्ञान संस्थेचा यावेळी गौरव करण्यात आला. सार्थक लांगडे आणि त्यांच्या चमुने हा पुरस्कार स्वीकारला.   
                 

00000

Saturday, June 17, 2017

‘लोकराज्य’चे इंग्रजी भावंड ‘महाराष्ट्र अहेड’चे केले प्रधानमंत्र्यांनी कौतुक



मुंबई,दि. 17 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रधानमंत्र्यांनी आज जाहीर कौतुक केले. प्रधानमंत्री कार्यालयाच्या @PMOIndia या व्ट‍िटर हँडलवरून थ्री इयर्स ऑफ रिबिल्डींग इंडिया’ या विशेषांकाची पाठराखण  प्रधानमंत्र्यांनी केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा विस्तृत आढावा या अंकात घेण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या भारताचे नवनिर्माण’ या लेखाचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने केलेल्या उत्तुंग कामगिरीचे विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी या लेखात केले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गितेकेंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयलकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीरकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खात्यांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे लेख व मुलाखती यांच्या या अंकात समावेश आहे. गेल्या तीन वर्षात राज्य शासनाला केंद्राकडून करण्यात आलेली मदत, केंद्र शासनाने पारदर्शी कारभारासाठी केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर लेख या अंकात आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘लोकराज्य’ मासिक प्रकाशित करण्याची दीर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महासंचालनालयाच्यावतीने मे 2017 चा ‘लोकराज्य’चा मराठीहिंदी, उर्दुगुजराती या भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्ये ‘महाराष्ट्र अहेड’ या नियतकालीकाचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.
                                                ००००० 

नवनवीन तंत्रज्ञान आत्‍मसात करुन येणा-या आव्‍हानांना सामोरे जा ‘सीएमई’च्‍या दीक्षांत समारंभात राष्‍ट्रपती मुखर्जी यांचे आवाहन






पुणे, दि. 16 – राष्‍ट्रीय- आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नवनवीन आव्‍हाने समोर येत आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहे. या सर्व आव्‍हानांना तुम्‍हाला सामोरे जायचे आहे. धैर्य, निष्‍ठा आणि समर्पित भावनेने आपण या  आव्‍हानांना  आत्‍मविश्‍वासाने सामोरे जाल,  असा विश्‍वास राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्‍यक्‍त केला.
 कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंगच्‍या (सीएमई) दीक्षांत समांरभात राष्‍ट्रपती मुखजी बोलत होते. यावेळी राज्‍यपाल सी. विद्यासागर  राव, सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज,  लेप्‍टनंट जनरल डी. आर. सोनी, सीएमइचे डेप्‍युटी कमांडंट व अधिष्‍ठाता  मेजर जनरल एच. के. अरोरा, पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. एम. जगदेश कुमार, डॉ. अनिल सहस्‍त्रबुध्‍दे आदी उपस्थित होते.
राष्‍ट्रपती श्री. मुखर्जी यांनी प्रारंभी पदवी आणि पदव्‍युत्‍तर पदवी संपादन करणा-या विद्यार्थ्‍यांना  शुभेच्‍छा दिल्‍या.  ते पुढे म्‍हणाले, दीक्षांत समारंभ हा कोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेच्‍या, शिक्षकांच्‍या,  विद्यार्थ्‍यांच्‍या, त्‍यांच्‍या पालकांच्‍या जीवनातील गौरवाचा  आणि  आनंदाचा क्षण असतो.
अभ्‍यासू वृत्‍ती, कष्‍ट आणि समर्पणाच्‍या भावनेने यश संपादन करणा-या सर्व विद्यार्थ्‍यांचे मनापासून अभिनंदन करुन ते पुढे म्‍हणाले, अभ्‍यासक्रम पूर्ण केल्‍यानंतर शिक्षण संपले असे नाही तर भविष्‍यातही नवनवीन ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रिया सुरु ठेवावी लागणार  आहे. सध्‍याच्‍या  युगात तंत्रज्ञान बदलत आहे.  नवनवीन संकल्‍पना पुढे येत आहेत. तरुण संशोधकांपुढे अद्ययावत ज्ञान संपादन करण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. सीएमईच्‍या विद्यार्थ्‍यांकडे  देश मोठ्या आशेने पहात आहे. चांगले अभियंते  आणि चांगले जवान अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत भारतीय लष्‍कराच्‍या कौशल्‍यवृध्‍दीत तुमचे योगदान राहील, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
सीएमई पुढील वर्षी आपल्‍या स्‍थापनेचा अमृतमहोत्‍सव  साजरा  करणार असल्याचा उल्‍लेख करुन राष्‍ट्रपती  श्री. मुखर्जी म्‍हणाले, राष्‍ट्रीय आणि आंतर्राष्‍ट्रीय स्‍तरावर संरक्षणविषयक वातावरण बदलत आहे. माहिती-तंत्रज्ञान,  सायबर गुन्‍हेगारी यामुळे लष्‍करी आणि डावपेचात्‍मक कौशल्‍यांचा वापर करावा लागणार आहे. परांपरागत आणि अद्ययावत ज्ञानाचा योग्‍य समन्‍वय राखून लष्‍करी सामर्थ्‍य वाढीसाठी आपणांस प्रयत्‍न करावा लागणार आहे.
सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज यांनी स्‍वागतपर भाषण केले.   लेप्‍टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी प्रास्‍ताविक केले. ते म्‍हणाले, देशात एकूण 32 लष्‍करी प्रशिक्षण संस्‍था असून सीएमई त्‍यापैकी एक आहे. भारतीय लष्‍कर कोणत्‍याही आव्‍हानांना सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज असल्‍याचे  स्‍पष्‍ट करत त्‍यांनी  सैन्‍य दलाचा दर्जा उत्‍तम राहण्‍यासाठी नियमित प्रशिक्षण दिले जात असल्‍याचे सांगितले.
सीएमइचे डेप्‍युटी कमांडंट व अधिष्‍ठाता  मेजर जनरल एच. के. अरोरा यांनी सीएमईच्‍या  अधिका-यांच्‍या ज्ञानाचा देशाच्‍या लष्‍कराला आणि लोकशाहीच्‍या संवर्धनासाठी लाभ होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली. 
 जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. एम. जगदीश  कुमार यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. सीएमइच्‍या गौरवशाली परंपरेचे जतन करुन तो वारसा पुढे चालविण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
 कार्यक्रमात विविध विषयात गुणवत्‍ता प्राप्‍त करणा-या अधिका-यांचा राष्‍ट्रपती मुखर्जी यांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये लेप्‍टनंट कर्नल रोहित ओबेरॉय, लेप्‍टनंट कर्नल मनोज सिंग, कॅप्‍टन आदित्य सिंग, कॅप्‍टन सदानंद सिन्‍हा, कॅप्‍टन विजयकुमार यादव, लेप्‍टनंट सौरभ पराशर, लेप्‍टनंट मनीष कुमार यांचा समावेश होता.
 सीएमइचे कमांडंट लेप्‍टनंट जनरल मायकेल मॅथ्‍यूज यांनी आभार मानले. दीक्षांत समारंभास लष्‍करी अधिकारी, विद्यार्थी आणि त्‍यांचे पालक उपस्थित होते.
****


Thursday, June 15, 2017

पारदर्शकता वाढविण्याबरोबरच लोकाभिमुख व्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल अधिकाऱ्यांना आवाहन









पुणेदि. १५ (विमाका):  महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून शासनाचा चेहरा आहे. या विभागाने पारदर्शकता वाढविण्याबरोबरच लोकाभिमुख होण्याची आवश्यकता आहे. शासनात काम करताना आपण शासक नाही तर जनतेचे सेवक आहोतहा भाव ठेवून काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
यशदा येथील संवाद सभागृहात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसाच्या राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उदघाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलअप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशीमहसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तवमाहिती-तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक विजयकुमार गौतमयशदाचे महासंचालक आनंद लिमये उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेमहसूल विभागामुळे राज्याच्या प्रशासनात गतिशीलता आणि लोकाभिमुखता आली आहे. देशपातळीवर गौरविण्यात आलेले राज्याचे जलयुक्त शिवार अभियान सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे  यशस्वी झाले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजनेतही महसूल विभागामुळेच राज्याचे काम चांगले झाले आहे. महसूल विभाग लोकाभिमुख असेल तरच राज्याची प्रतिमा चांगली होणार आहे.
गेल्या दोन वर्षात सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि बदल सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. शासनाने निर्गमित केलेल्या लोकोपयोगी शासन निर्णयांचा जिल्हाधिकारी स्तरावर योग्य अभ्यास होण्याची आवश्यकता असून या शासन निर्णयांचा लाभ सामान्यांना करुन द्यावा. महसूल विभाग हा मल्टिटास्किंग करणारा विभाग आहेएकाच वेळी अनेक विषयांवर महसूल विभाग काम करत असतो. मात्र हे करताना पारदर्शकतेला महत्व देण्याची आवश्यकता आहे.
इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या सोयीची महसूल व्यवस्था उभी केली होती. त्याचा पाया नकारात्मकतेचा होता. मात्र आता आपण शासक नाही तर सेवक आहोत,ही भावना रुजवून महसूल विभागाने सकारात्मकतेने काम करण्याची आवश्यकता आहे. सामान्य लोकांचे जीवन अर्धन्यायिक प्रकरणात जातेत्यासाठी अशी प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करावा. महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावे.
सरकारमध्ये पारदर्शकतेला महत्व आहे त्यामुळे शासनात गतीमानतेबरोबरच पारदर्शकता वाढविण्यावर भर दयावा. पारदर्शी कारभाराने अडचणी व त्रास कमी होतो. पारदर्शकता आल्यानंतरच प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली आहे. त्यासाठी महसूल विभागाला अधिक तयारी करावी लागणार आहे. शेतकरी कर्ज माफी करताना एकही गरजू सुटू नये आणि चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नयेयाची काळजी घ्यावी लागणार आहे.
महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत मुख्यमंत्री महोदायांसमोर विभागाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये रिक्त पदांची भरती तत्काळ करावी. जुन्या महसूल विभागाच्या इमारतींची नव्याने उभारणी करावी. त्यासाठी भूसंपादनासाठी असलेली ३ टक्क्यांची रक्कम महसूल विभागाला तत्काळ वर्ग करावी. आदींचा समावेश होता.
यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवीजमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमनोंदणी महानिरीक्षक अनिल कवडेनाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडेऔरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरनागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमारकोकणचे विभागीय आयुक्त जगदीश पाटीलआदी उपस्थित होते.
            या परिषदेत सुरवातीला राज्यातील ई-फेरफार कार्यक्रमसातबारा चावडी वाचनई-मोड्यूल कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (आरटीएस) अंतर्गत विकसित आज्ञावली संदर्भात महाऑनलाईनचे राहुल सुर्वे यांनी सादरीकरण केले. तसेच अकृषिक धोरणातील महत्वाच्या सुधारणा व त्याची फलश्रुती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील ४४ अ आणि महाराष्ट्र कुळ कायदा कलमांच्या तत्सम कायद्यामधील सुधारणांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
            यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मंजूर असलेला विकास आराखडा आणि प्रादेशिक आराखड्यात समावेश असलेल्या जमिनींना अकृषक परवाने देण्याची गरज नाही. फक्त अकृषक कर भरून नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याच्या सूचना दिल्या.
            ही महसूल परिषद दोन दिवस चालणार असून यामध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व उपायुक्त (महसूल), नोंदणी महानिरीक्षक, पुणे जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सर्व उपसंचालक सहभागी आहेत.  
****